
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. दि.०३ एप्रिल रोजी अखेर हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या १८ जागेसाठी ९२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आता नामनिर्देशन वापस घेतल्यानंतर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दि. २७ मार्च पासून विविध पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलं असून, शेवटच्या दिवशी म्हणजे ३ एप्रिल पर्यंत ९२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वसाधारण मधून (७) जागेसाठी ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. महिला मधून (२) जागेसाठी ८ जणांची उमेदवारी, इतर मागासवर्गीय मधून (१) जागेसाठी ४ जणांची उमेदवारी, विमुक्त व भटक्या जाती मंडून (१) जागेसाठी ६ जणांनी अर्ज दखल केले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण मधून (२) जागेसाठी १० जणांचे अर्ज, अनुसूचित जाती/ जमाती मधून (१) जागेसाठी ५ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्थिक दुर्बल घटकामधून (१) जागेसाठी ३ जणांनी अर्ज दिले आहेत. यासह आडते, व्यापारी मतदार संघ, हमाल व मापाडी मतदार संघमधील (४) जागेसाठी १४ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.


या सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी दि. ५ रोजी होणार असून दि.६ ते २० पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. यानंतर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहतील हे स्पष्ट होणार आहे. दि.२१ ला निशाणी वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, दि. २८ ला प्रत्यक्षात मतदान होऊन दि.२९ ला मतमोजनी व निकाल जाहीर होणार आहे. एकूणच काँग्रेस स्वतंत्र लढणार असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस हे संयुक्त, तर बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी हे युतीत निवडणूक लढणार असल्याने सध्यातरी तीन गटात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसते आहे. तर हम भी कुछ कम नाही असे दाखवून देण्याचा प्रयत्न काही अपक्ष उमेदवारांनी चालविला असल्याचे पाहावयास मिळते आहे.


या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवरांची संख्या मोठी असल्याने सर्वच पक्षाला डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या अनेकांनी विरोधी पक्ष गटाकडून तर काहींनी अपक्ष उमेदवारी भरली आहे. आता अर्ज माघारी नंतर आघाडी व युती कशी होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पार्टी आदींकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आजी – माजी आमदारांनी व शिंदे गट व भाजपने कंबर कसली असून, आपापल्या पद्धतीने बैठक घेऊन आपले वर्चस्व कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रस्तापित करण्यावर भर दिला आहे.
