
नांदेड| सिडको प्रकल्पातील मुळ मालकांच्या अनुपस्थितीमध्ये घरे हस्तांतरित करण्याचा प्रश्नावर नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी तातडीने तोडगा काढून सिडको वाशियांना दिलासा देणे बाबत प्रशासनाने कारवाई करावी. अशी मागणी वारंवार करीत होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या मागणी बाबत दिनांक 03 एप्रिल 23 रोजी छत्रपती संभाजी नगर येथील उद्योग भवन सिडको मध्ये बैठक आयोजित केली होती.


सदर बैठकीमध्ये (मुख्य प्रशासक) सिडको राधा विनोद शर्मा यांच्या सह नांदेड सिडको प्रकल्पाचे प्रशासक भुजंग गायकवाड व ईतर अधिकारी व दक्षिण अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अस्लम शेख उपस्थित होते. नांदेड येथील सिडको रहिवाशांचा प्रलंबित प्रश्न आगामी काळात सोडवण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या सिडको महामंडळाच्या संचालक बैठकी मध्ये (कार्यकारी संचालक) यांची अंतिम मान्यता घेऊन नांदेड येथील सिडको प्रकल्पातील मुळ मालकांच्या अनुपस्थितमध्ये घरे हस्तांतरित करण्याच्या प्रश्न अंतिम मान्यता घेऊन मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यामुळे सिडको प्रकल्पातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळून अनेक वर्षापासून त्यांच्या घरांचा रखडलेला प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

