
हिमायतनगर,अनिल मादसवार| जय हनुमान.. जय श्रीराम…. बजरंग बली की जय… पवनसुत हनुमान की जय.. च्या जयघोषात भक्तांनी नारळ फोडुन श्रीचे दर्शन घेतले. चैत्र शुद्ध नवमी दि.०६ एप्रिल गुरुवारी आलेल्या हनुमान जन्मोत्सव निमित्ताने मंदिर कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईच्या गर्तेतही मंदिर परिसरात दर्शनासाठी विदर्भ – तेलंगाना – कर्नाटक- मराठवाड्यातील ग्रामीण भागातुन हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील मारोती मंदिरात नवसाला पावणाऱ्या संकटमोचन श्री मारोतीरायाच्या दर्शनासाठी सकाळी ४ वाजेपासूनच श्रध्दाळु भक्तांच्या रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले आहे.


प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री बजरंगबली हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा तथा मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो…..असे जुन्या जनकारातून सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंगबली मुर्तीची प्रतीष्ठापना करुन मारोतीरायाचे मंदीर गावाच्या सुरक्षेच्या हेतुने उभारलेले असते. या दिवशी हनुमानाला प्रीय असलेली रुचकीच्या पाने – फुलांची पुष्पमाला, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करण्याची मनोकामना भक्त करतात. त्याच पार्श्वभूमीवर आज दि.०६ एप्रिल बोरगडी येथील श्री मारोती मंदिरात ३५ हजाराहून अधिक भाविकांनी मारोतीरायाचे दर्शन घेऊन मनोकामना केली आहे. दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक भक्त मोठ्या संख्येने सहपरिवारसह दाखल झाले होते. ज्यांचा नवस आहे असे भाविक हिमायतनगर शहरापासून तळपत्या उन्हात पैदल चालत येऊन हनुमंतरायाचे दर्शन घेत आपला नवस फेडताना पाहावयास मिळाले आहे. दरम्यान यात्रा उत्सवानिमित्त खेळणी साहीत्यासह सौंदर्य प्रसाधनाची दुकाने दाखल झाल्याने दर्शनाच्या गर्दीने यात्रा फुलली असली तरी, दुष्काळी आणि महागाईच्या परिस्थितीचे सावट यात्रेवर दिसून आले आहे.


दि.०६ गुरुवारी श्री बजरंगबलीचा जन्मोत्सव चैत्र पोर्णीमेच्या दिवशी मोठ्या हर्षोल्हास व मंगलमय वातावरणात हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील मारोती मंदिरात पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंगलमय मंत्रोच्चारात आणि हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळवकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मध्यरात्री ०४ वाजल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे. दि.०७ हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या समारोप दिनी हभप.सदानंद महाराज फळेकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान होणार असून, त्यानंतर भव्य महाप्रसाद होणार आहे. दुपारी १२ ते ०२ वाजेच्या दरम्यान कठाळ्याची हर्राशी त्यानंतर दुपारी कुस्त्यांची दंगल सुरु होणार आहे. कुस्तीत विजेत्या मल्लाना बक्षीसे प्रदान करुन गौरवीण्यात येणार आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यातील तमाम कुस्ती शौकीन व मल्लांनी हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन मारोती मंदिर कमेटी आणि गांवकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


ग्रामीण भागातही हनुमान जन्मोत्सव साजरा
तालुक्यातील मौजे सातशीव वटफळी येथील हनुमान मंदिरासह, हिमायतनगर शहरातील पवनसुत हनुमान मंदिर, पोलीस ठाण्याजवळील दक्षीन मुखी हनुमान मंदिर, रुख्मिणी नगर परिसरातील हनुमान मंदिर, पळसपुर हनुमान मंदिर, सवना ज, दरेसरसम, सरसम बु, मंगरुळ, वडगांव ज, आंदेगाव, कार्ला पी., पोटा बु, सिबदरा, सिरंजणी, एकंबा, पवना, टेंभी, डोल्हारी, सिरंजणी यासह अन्य छोट्या मोट्या गावात रामभक्त श्री हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जवळपास सर्वच मंदिरात भजन – किर्तन, महाप्रसादाच्या पंगती करण्यात आल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.