
नांदेड। क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने शालेय स्पर्धेच्या धर्तीवर नांदेडमध्ये 7 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातील जवळपास 800 खेळाडू, प्रशिक्षक, 40 पंच , पालक अनेक आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू , मार्गदर्शक सहभागी होत असून जिल्हा क्रीडा कार्यालय इंडोर हॉल श्री गुरुगोविंद सिंग स्टेडियम नांदेड येथे होत आहे.


सदरील स्पर्धेचा नांदेडकरांनी आस्वाद घेण्याचे आवाहन स्पर्धा समितीचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास भुसेवार यांनी केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने मान्यताप्राप्त स्टेअर्स संघटनेच्या वतीने हे आयोजन होत असून या स्पर्धेत सबज्युनिअर , केडेड , ज्युनिअर व सीनियर तसेच फ्रेशर वयोगटात विविध वजन गटात किरोगी व पुमसे या प्रकारात स्पर्धा होणार आहेत.


यात सुवर्णपदक विजेते हे 14 ते 16 एप्रिल दरम्यान इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. अगदी ४ वर्षापासून ते ४० वर्षांपर्यंत खेळाडू यात सहभाग नोंदविणार असून त्याचा आनंद नांदेडकरांनी घ्यावा असे आवाहन श्रीनिवास भुसेवार यांनी केले आहे. विजेत्या खेळाडूंना उच्चत्तम दर्जाच्या सुवर्ण , रौप्य व कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्टेअर्स फाउंडेशनचे प्रमुख व्यवस्थापक श्री पारस मिश्रा ( दिल्ली) पियुष जैन (मध्य प्रदेश ) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

