
नांदेड। दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एप्रिल 2021 मध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळ मा.आ.श्री.अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झाले. त्यानंतर सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी वेळोवेळी शासन स्तरावर बँकेची बाजु मांडुन व पाठपुरावा करुन शासन थकहमीचा प्रश्न निकाली काढल्यामुळे व त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नवनिर्वाचीत संचालक मंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे व बँक कर्मचा-यांनी निर्णयाची अंमलबजावणी योग्य रित्या केली असल्याने मार्च 2023 अखेर बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खालील प्रमाणे प्रगती झालेली आहे.


बँकेस मार्च 2023 अखेर मागील दशकामधील उच्चांकी निव्वळ नफा रु.37.22 कोटी झाला असून त्यामुळे बँकेच्या संचित तोट्यामध्ये घट होवून तो रु.99.67 कोटी वरुन कमी होवुन रु.62.45 कोटी शिल्लक आहे. बँकेच्या ढोबळ अनुत्पादीत कर्जाचे प्रमाण 9% ने कमी झालेले आहे. (मार्च 2022 अखेर 26.66% – मार्च 2023 अखेर 17.85%) बँकेच्या मार्च 2023 अखेर ठेवी रु.761.12 कोटी ठेवी आहेत, बँकेने जिल्ह्यातील शेतकरी व पगारदार पतसंस्थांना केलेल्या कर्ज वाटपामध्ये सुध्दा मार्च 2022 च्या तुलनेत रु.17.76 कोटीने वाढ झालेली आहे. (मार्च 2022 अखेर रु.725.83 कोटी- मार्च 2023 अखेर 743.59 कोटी), बँकेच्या भाग भांडवलामध्ये रु.2.37 कोटीने वाढ झालेली आहे. (मार्च 2022 अखेर भाग भांडवल रु.65.85 कोटी – मार्च 2023 अखेर 68.22 कोटी), बँकेच्या नक्त मुल्यामध्ये मार्च 2022 च्या तुलनेत रु.25.74 कोटीने वाढ झालेली असुन (मार्च 2022 अखेर नक्तमुल्य रु.94.26 कोटी – मार्च 2023 अखेर 120.00 कोटी), CRAR चे प्रमाणामध्ये सुध्दा 3.88% ने वाढ झालेली आहे. (मार्च 2022 अखेर CRAR रु.14.12% – मार्च 2023 अखेर 18.00% ).


सध्या बँकींग क्षेत्रात स्पर्धेचे युग असुन बँकींग व्यवसायात अमुलाग्र बदल झालेले आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार बँकेने कोअर बँकींग प्रणाली, RTGS / NEFT ची सुविधा, SMS अलर्टची सुविधा, Rupay KCC व Rupay Debit कार्डची सुविधा व ग्राहकांच्या खात्यामध्ये थेट रक्कमा जमा करण्याची सुविधा (DBT) जिल्ह्यातील सर्व शाखांमधुन ग्राहकांना उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच बँकेमार्फत पंतप्रधान जिवनज्योती विमा योजना, पंतप्रधान जिवन सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, शासनाची व्याज अनुदान योजना इत्यादी योजना बँक अत्यंत प्रभावीपणे राबवित आहे. गेल्या पाच वर्षापासुन जिल्ह्यामध्ये नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधव अडचणीमध्ये आहेत. त्यांची अडचण लक्षात घेता शासनाकडुन प्राप्त होणा-या मोठया प्रमाणावरील अनुदानाच्या रक्कमांचे कुठल्याही वेळेचा व कार्यालयीन सुट्टीचा विचार न करता बँक आस्थापनेवर अपुरी कर्मचारी संख्या असतांना सुध्दा बँक कर्मचारी यांनी वाटप केलेले आहे.


तसेच सन 2005 च्या दरम्यानचे कालावधीमध्ये बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली गेली असल्याने अनेक शाखा बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ठेवीदारांना, शेतकरी बांधवाना बँकींग व्यवहार करणेसाठी त्यांचे नजिकचे शाखांना जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्ची पडत आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा बँकने नाबार्डच्या सहकार्याने दोन ए.टी.एम. व्हॅन घेतलेल्या आहेत. सदरची व्हॅन ग्रामीण भागात जावुन शेतकरी बांधव व ठेवीदार यांना त्यांचे वस्तीत सेवा देणार असुन त्यांना बँकींग व्यवहार करणे सोईचे होणार आहे.

बँकेने खरीप हंगाम 2021 मध्ये एकूण 315 कोटी रुपये कर्ज वाटप केले होते. त्या तुलनेत खरीप 2022 साठी 393.77 कोटी रुपयाचे कर्ज वाटप केलेले आहे. जे की दिलेल्या उद्दीष्टाच्या 110% एवढे आहे. जिल्हा बँकेची भूमिका जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अडचणीच्या प्रसंगी मदत केली पाहीजे या सामाजिक व सहकार्याच्या भावनेने जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कर्ज वाटप केलेले आहे. यावरुन जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी किती महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे ते दिसुन येते. त्यामुळे कर्जदार सभासदांनी सुध्दा उचल केलेल्या कर्जाची वेळेत वसुली देवून बँकेस सहकार्य करावे व शासनाच्या व्याज अनुदान सवलतीचा लाभ घ्यावा.

तसेच जिल्हा बँक ही आपली संस्था असल्यामुळे आपले सर्व आर्थिक व्यवहार आपल्या बँकेतुनच करावेत. बँकेतील ठेवींना ठेव विमा महामंडळाकडून देण्यात येणा-या योजने अंतर्गत रु.5 लाखापर्यंत विमा संरक्षण आहे त्यामुळे आपल्या ठेवी सुध्दा जिल्हा बँकेत ठेवून आपला बँकेवरील विश्वास वृधिंगत करावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा.वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण, उपाध्यक्ष मा.हरिहररावजी विश्वनाथराव भोसीकर, बँकेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय साहेबराव कदम यांच्याकडून करण्यात येत आहे.
