
नांदेड| आजच्या अत्यंत संवेदनशीलता हरवत चाललेल्या काळात मुलांवर चांगले संस्कार होणे ही पालकांचीच जबाबदारी असून बौद्ध कुटुंबातील मुलांवर योग्य वेळी धम्मसंस्कार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते देगाव चाळ येथील रमामाता आंबेडकर महिला मंडळ आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भिक्खू श्रद्धानंद, भंते संघप्रिय यांच्यासह भिक्खू संघ, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले, मारोती कदम, कवी रणजीत गोणारकर, प्रकाश ढवळे नागलगांवकर, संयोजक सुभाष लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आणि माता रमाई आंबेडकर महिला मंडळाकडून चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जवळा देशमुख येथे डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एक वही एक पेन अभियान राबविण्यात आले. तसेच शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच वाजेगाव परिसरातील १०० नंबर वीट कारखाना येथे वीट कामगारांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच वीट कामगारांच्या मुलांसाठीही ‘एक वही एक पेन’ अभियान राबविण्यात आले. तिसऱ्या सत्रात देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूष्पपूजन झाल्यानंतर उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने त्रिसरण पंचशील दिले.


त्यानंतर भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ६९ व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात कवी अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, मारोती कदम, भैय्यासाहेब गोडबोले, रणजीत गोणारकर, प्रज्ञाधर ढवळे यांनी सहभाग नोंदवला. काव्यपौर्णिमेनंतर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना खीरदान करून भिक्खू संघाच्या आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुभाष लोखंडे यांनी केले तर आभार प्रज्ञाधर ढवळे यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माणिकराव हिंगोले, अनिल निखाते, गोमाजी धुळे, गौतम कापुरे, रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या शिल्पा लोखंडे, निर्मलाबाई पंडित, गयाबाई हाटकर, भिमाबाई हाटकर, सविताबाई येवले, संगीताबाई थोरात, चौत्राबाई चिंतुरे, सुमनबाई वाघमारे, विमलबाई हाटकर, आशाबाई हाटकर, छायाबाई थोरात, गुंजाबाई खाडे, नानाबाई निखाते, सोनाबाई राजभोज, विमलबाई नरवाडे, प्रतिभा गोडबोले, पूजा कापुरे, शोभाबाई पवार, पारूबाई हिंगोले, सुनीताबाई हिंगोले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
