
समाजातील लोकांचे अज्ञान, दारिद्र्य, विषमता, स्त्री वर्गाची अव्हेलना नष्ट करून मागासलेल्या सर्व बांधवांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालण्याचा ज्यांनी निश्चय केला , उच्चवर्णीयांच्या प्रतिगामी वृत्तीला धक्के देण्यासाठी ज्यांनी सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीत मानवतावादी तत्त्वाने बदल घडून आणले, ज्यांनी लोकसेवेचा निश्चय केला , अज्ञान म्हणजे अंधार आणि शिक्षण म्हणजे प्रखर सूर्यप्रकाश आहे आणि समाज परिवर्तनासाठी शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे हे ज्यांनी जाणले ,अनुभवले ,कृतीतून उतरवले असे महान क्रांतीसूर्य म्हणजे महात्मा फुले होय.


मानवी हक्कावर 1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक “राइट्स ऑफ मॅन” महात्मा फुले यांच्या वाचनात आले आणि त्या पुस्तकाचा त्यांच्या मनावर चांगलाच प्रभाव पडला. त्यांच्या मनात सामाजिक न्यायाबाबत विचार येऊ लागले येथूनच त्यांच्या विषमता दूर करण्याच्या कार्यास सुरुवात झाली व जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत महात्मा फुले यांनी समतावादी समाज रचनेचा निर्मितीसाठी कार्य आणि प्रयत्न केले. महात्मा फुले यांच्या मते,” कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही” आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे त्यामुळे मानवाने गुण्यागोविंदाने राहावे .सर्व प्राणीमात्रांना निर्माणकर्त्याने उत्पन्न करतेवेळेस मनुष्यास जन्मताच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले व आपापसात सर्व हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले.


निर्माणकर्त्याने मानवाची निर्मिती करताना कुठलाही भेदभाव केला नाही. हिंदू धर्मातील कर्मकांडे ,अंधश्रद्धा यावर महात्मा फुल्यांनी कडाडून टीका केली. महात्मा फुले यांच्या मते,” कर्म आणि गुण” मनुष्याचे सर्वात महत्त्वाचे आहेत. ते एक दूरदृष्टी कोणातून विचार करणारे समाजसुधारक होते. त्यांना समाजात आमुलाग्र बदलाची अपेक्षा होती ते धर्मप्रवर्तक नव्हते परंतु त्यांचे असे म्हणणे होते की, समाजातील धार्मिक विषमतेमुळे कोणत्याही प्रकारचा बदल शक्य नाही आणि जोपर्यंत धर्मात सुधारणा आणि धार्मिक विचार बुद्धीवर आधारित निर्माण होत नाहीत तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य आहेत.भारतीय समाजातील धार्मिक आस्था, मान्यता, विश्वास, कर्मकांडे इत्यादींचा अर्थच हे सर्व ईश्वर मानने असा होतो. अशा प्रकारच्या भारतीय समाजातील सामाजिक ,राजकीय ,आर्थिक, शैक्षणिक बौद्धिक, सांस्कृतिक, नैतिक इत्यादी सर्व प्रकारचे शोषण ईश्वरावर आधारित होते. महात्मा फुले यांच्या मते, जोपर्यंत परमेश्वराशी निगडित स्वार्थी आणि पाखंडी लोकांच्या कल्पना ,अंधश्रद्धा, कुप्रथा यांना दूर केले जात नाही तोपर्यंत समाजात सुधारणा अशक्य आहेत.


यासाठीच महात्मा फुले यांनी ईश्वरवाद, देववाद, अवतारवाद ,पुनर्जन्मवाद , मूर्तीपूजा इत्यादींवर कठोर टीका केली. त्याचबरोबर यासाठी धर्माचे ठेकेदार/ पुरोहित /मध्यस्थ इत्यादींना जबाबदार ठरवले. महात्मा फुले यांच्या मते, स्वार्थी पुरोहित आणि पाखंडी पंडितांनी सर्वसामान्य लोक, शूद्र त्याचबरोबर अतिशुद्र यांना गुलाम बनवून ठेवण्यासाठी त्याचबरोबर आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी अनेक चुकीच्या धर्मग्रंथांची रचना केली .ज्यात केवळ पाखंडी आणि काल्पनिक गोष्टी अंतर्भूत आहेत ज्याच्या जाळ्यात अज्ञानी ,निरक्षर जनतेला फसून त्यांनी आपला स्वार्थ पूर्ण केला हे सर्व अनादी कालखंडापासून चालत आले आहे.

महात्मा फुल्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती .त्यांचे म्हणणे असे होते की, मंदिरातला देव विशिष्ट लोकांच्या पोट पूजेचे माध्यम आहे .ते म्हणतात सृष्टीचा सर्वेसर्वा निर्माता एका दगडाचा देव कसा का मर्यादित असू शकतो ?ज्या दगडापासून सडक ,इमारती, घरे इत्यादी बनवल्या जातात त्यात देव कसा असू शकतो ?आणि दगडात देवता मंत्राद्वारे येऊ शकतात तर मग मंत्राद्वारे मृत जीवांना ही जिवंत केले जाऊ शकते ते असे का होत नाही ?असे अनेक प्रश्न महात्मा फुलेंनी पाखंडी लोकांना विचारले आहेत त्याचबरोबर महात्मा फुलेंनी वर्णावर आधारित जातीव्यवस्थेला धर्म मानण्याला सुद्धा कडाडून विरोध केला आहे. महात्मा फुले यांच्या मते, जातीप्रथा धर्म नाही तर ते विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची इतर लोकांना कमी मानण्याची प्रवृत्ती आहे .त्याचबरोबर व्यवसायालाही धर्म मान्यवर त्यांनी कडून टीका केली आहे.

ते म्हणतात एका व्यक्तीकडून आपली जीविका भागवण्यासाठी केले गेलेले कार्य त्याचा व्यवसाय/ धंदा आहे ना की धर्म .जसे: – शेती काम करणे कुणब्याचा धर्म नाही तर तो त्याचा व्यवसाय/धंदा आहे.महात्मा फुले म्हणतात सर्वसृष्टीचा निर्माता एक आहे आणि त्यानेच सर्वसृष्टीच्या विविध घटकांची निर्मिती केली असेल तर अनेक धर्म कसे असू शकतात? हा महात्मा फुल्यांना पडलेला प्रश्न तुम्हा -आम्हाला विचार करण्यास भाग पाडण्यास नक्कीच प्रवर्तक ठरणार आहे. पुढे महात्मा फुलेंचे असेही म्हणणे होते की ,कोणत्याही व्यक्तीला सामाजिक समता, राजकीय सहभाग ,धार्मिक आणि आर्थिक स्वातंत्र्य तसेच शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे , शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून धर्माच्या आधारावर शोषण करणे आणि शोषणास धर्म मानणे एक क्रूर प्रकारची आणि निर्दयी वृत्ती आहे.

महात्मा फुले यांच्या विचारानुसार धर्म आत्मशुद्धी आहे, सदाचरण आहे ज्याद्वारे मानवाच्या शारीरिक ,मानसिक आणि बौद्धिक विकासाचे प्रयत्न केले जातात. धर्म हा दुसरे तिसरे काही नसून तो मानवाची एक सेवा आहे. ती स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची भावना आहे .धर्म समाज हितासाठी, समाज कल्याणासाठी आहे .जो धर्म समाजहित पाहत नाही तो धर्म सत्य धर्म नाही. मानवातील कोणत्याही प्रकारच्या जातीभेस पूर्णत: असत्य ,मूर्खतापूर्ण आणि मानवतेच्या विरोधी कृत्य महात्मा फुलेंनी मानले आहे. त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की, निर्मिकाने सर्व मानवाला समान बनवले आहे त्यामुळे त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा जातीभेद नाही या संदर्भाने ते पुढील ओळीतून व्यक्त होतात,
“मातंग आर्यों में जांचते ही खून एक,
एक ही आत्मा जाना दोंनो में ।
दोंनो समान सब खाते-पीते,
इच्छा भी भोगते।एक समान।
मातंग आर्य दोंनो शोभा मानव की।
दोंनो का आचरण एक जैसा ।
पुछता हुॅ सब हुयें कैसे नीच आर्य क्यों ऊॅच । “
महात्मा फुलेंनी कर्मावर आधारित जातीय मान्यतेचे खंडन केले आहे. त्यांच्या मते, कर्म आणि गुणांवर आधारित मानवाच्या जातीनिर्धारित करणे चुकीचे आहे .त्यांच्या विचारानुसार वांशिक समूहात उच्च-निच्च निर्धारित करणे चुकीचे आहे आणि ते मानवता, सदाचार आणि नैतिक तत्त्वांच्या विरुद्ध/ विसंगत आहे .सर्व व्यक्ती मग तो स्त्री असो वा पुरुष जन्मत: समान आहेत त्यामुळे त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव पूर्ण व्यवहार नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विरोधाभासी आहे. तसेच तो ईश्वरासोबतचा अपराध आहे. महात्मा फुले यांच्या मते ,समाजाच्या विकासासाठी समाजात संघटन आवश्यक आहे आणि हे संघटन निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व सदस्यांना स्वातंत्र्य ,समानता आणि बंधूभावाची संधी देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता या हक्काशिवाय समूहात संघटन शक्य नाही.
महात्मा फुले यांच्या मते ‘विश्व एक कुटुंब आहे’ समाजातील संस्कृती वेगवेगळ्या असू शकतात, समाजव्यवस्था भिन्न भिन्न असू शकतात परंतु मानव मात्र एक आहे. याचा अर्थ ईश्वर सुद्धा एक आहे . ईश्लावरालाही जातीभेद मान्य नाही. आणि त्यामुळे मानवता सर्वश्रेष्ठ आहे. जाती ,धर्म, वर्ण ,उच्च- निच्च या सर्व बाबी पाखंडी लोकांची देण आहे. समाजात पाखंडी पुरोहितांनी पारंपारिक उत्सव, जन्म, मुंडन ,विवाह अशा अनेक प्रकारच्या कर्मकांडांच्या माध्यमातून आपली श्रेष्ठता स्थापित केली होती. महात्मा फुले यांच्या मते सर्व समारंभात पाखंडी पुरोहितांचा जोपर्यंत समाज बहिष्कार करत नाहीत तोपर्यंत समाजातील उच्च-निच्च भेदभाव संपत नाही. पुढे महात्मा फुले म्हणतात, स्वातंत्र्य आणि संधीची समानता प्रत्येक मनुष्याची प्राथमिक आवश्यकता आहे. स्वातंत्र्याच्या आभाळामुळे कोणत्याही मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास होऊ शकत नाही आणि ही स्वातंत्र्याची भावना जर भेदभाव करून दिली जात असेल तर ते चुकीचे आहे.
महात्मा फुलेंनी समाजात असलेल्या स्पर्श आणि अस्पृशतेस सर्वात मोठा गुन्हा मानले आहे. यावर टीका करताना म्हणतात, की कट्टरपंथीय पाखंडी पुरोहितांनी परमेश्वर आणि मानवता दोन्ही सोबत छळ केले आहे. जे व्यक्ती सभ्यतेच्या शर्यतीत मागे राहिली त्यांच्यासोबत पशु पेक्षाही भयानक व्यवहार केला .हे लोक आपल्या घृणीत विचारसरणीमुळे कचरा आणि गवत खाणाऱ्या गाईचे गोमूत्र पिऊन स्वतः ला पवित्र करत होते आणि स्वतःला पवित्र मानत होते परंतु एका शुद्राच्या हातून स्वच्छ पाणी पिणे त्यांना मान्य नव्हते ही किती भयानक विदारक स्थिती आहे. आजही अनेक लोकांच्या मनात ही घृणीत विचारसरणी आढळून येते हे आमच्या समाजाचा दुर्भाग्य आहे.
महात्मा फुले यांच्या मते, समाजातील धार्मिक कट्टरता आणि अंधश्रद्धा सामाजिक एकता आणि बंधुता यातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यांचे असे म्हणणे होते की, जोपर्यंत समाजातील प्रचलित वर्ण ,धर्म आणि जातीप्रथेचे उच्चाटन होत नाही तोपर्यंत समाजाचे संघटन समानतेच्या आधारावर होत नाही .संपूर्ण समाजाचा विकास यामुळे होऊ शकत नाही. महात्मा फुलेंनी भारतीय समाजातील वर्ण ,जाती व्यवस्थेचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे आव्हान केले. यासाठी त्यांनी एक सामाजिक संघटना सुद्धा स्थापन केली जी ” सत्यशोधक समाज “या नावाने ओळखली जाते .आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी आजीवन समानता, मानवतेसाठी प्रयत्न केल्याचे दिसून येतात.
धर्माच्या आधारावर गरीब जनतेचे शोषण होत होते आणि गरीब ,अज्ञानी, निरक्षर ,निष्पाप जनतेचे हे होणारे शोषण थांबवायचे असेल तर आर्थिक दृष्ट्या या गरिबांना, निरीक्षणांना वागवणाऱ्या व्यवस्थेला पर्याय देण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथाद्वारे एक योग्य पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात हिंदुधर्माचेच सर्व रीवाज आहेत परंतु ते पाळताना त्यातून गरिबांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले आहे. त्या “सत्य धर्माची” काही मूलभूत तत्वे आहेत,
“सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत आणि परमेश्वर त्यांचा आई बाप आहे. ईश्वर एकच असून तो निर्गुण आणि निराकार आहे ,परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आई आणि बापाला भेटण्यासाठी मध्यस्थीची गरज नसते त्याचप्रमाणे परमेश्वराला प्रार्थना करण्यासाठी पाखंडी पुरोहितांची/ मध्यस्ताची सुद्धा आवश्यकता नसते.”
महात्मा फुलेंची ही सत्यशोधक चळवळ समाजातील कोणत्याही एका विशिष्ट वर्गाविरुद्ध नव्हती तर बहुजन समाजात जागृती घडून आणण्यासाठी ती होती. आणि बहुजन समाजामध्ये जागृती घडून आणणे सत्यशोधक समाज चळवळीचे उद्दिष्ट होते. या सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे महात्मा फुले यांनी केली आणि या समाजाचा प्रमुख उद्देश धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे हा होता. “सर्व साक्षी जगती त्याला नकोच मध्यस्ती” हे या समाजाचे ब्रीदवाक्य होते. समता, बंधुता ,स्वातंत्र्य ही तत्वे रुजवण्यासाठी महात्मा फुले यांनी या समाजाची स्थापना केली आणि त्यांनी “सत्याला” धर्म विचारात महत्त्व दिले आहे. ते म्हणतात”,सत्य सर्वांचे अदिघर । सर्व धर्माचे माहेर ।।”हिंदू धर्मातील वर्ण वर्चस्व, विषमता, उच्चवर्णीयाचे विशेष अधिकार, शुद्रावर लादलेले अन्यायकारी निर्बंध इत्यादी बाबतीत त्यांचे विचार प्रगत होते त्यांनी आपल्या विचारातून सर्वसमावेशक अशा “उदारमतवादी कुटुंबाचे” चित्र रेखाटले होते. त्यांच्या विचाराने बहुजन समाजात जागृती झाली आणि समतेवर आधारित मानवता धर्माचा पुरस्कार खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या कार्यातून आणि विचारातून आचरणात आणला आणि लोकांपर्यंत पोहोचवला.
अशाप्रकारे खऱ्या धर्माची तत्वे सांगितल्यावर ही सर्वसामान्य माणूस हा चुकीचे वागू शकतो. हे लक्षात घेऊन या सत्यशोधक समाजाचे जे सदस्य होते त्यांच्यासाठी सर्व सहमतीने जन्म, बारसे, लग्न ,अंत्यविधी ,बारावे , वर्षश्राद्ध या सर्व विधींसाठी एक नियमावली सत्यशोधक समाजाने सर्वसामतीने तयार केली. ज्यामध्ये जुन्या विधी, रितीरिवाज यात उच्चवर्णीयांकडून होणार जे आर्थिक शोषण होतं त्या शोषणाला फाटा देण्याचे काम करण्यात आल्याचे दिसून येते. जसे: – की एखाद्याचे श्राद्ध असेल किंवा तेरवी असेल तर अशावेळी सत्यशोधक विचारसरणीच्या लोकांनी शाळेत जाणाऱ्या निराश्रीत विद्यार्थ्यांना मदत द्यावी असा दंडक घालून दिला .अशा अनेक विधायक कामासाठी समाजातील उच्च वर्गाचा रोष पत्करून या सत्यशोधक धर्माच्या माध्यमातून क्रांतीचे बीज समाजात रुजवणे हाच खऱ्या अर्थाने ज्योतिबांचा” विश्व कुटुंब वादाचा सार्वजनिक सत्य धर्माचा जाहीरनामा आणि हा धार्मिक दृष्टिकोन आहे” अशा या दूरदृष्टी कोण ठेवून समाजात कार्य करणाऱ्या सत्यधर्म वादी विचारवंतास जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम।
…..लेखिका…डॉ सत्यभामा सतिषकुमार जाधव, सद्स्या बाल कल्याण समिती, नांदेड, मो.नंबर: -9403744715