
नांदेड| हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने दि. 5 एप्रिल रोजी जागृत हनुमान मंदिर, कैलास नगर येथे व दि. 6 एप्रिल रोजी संकटमोचन हनुमान मंदिर, जिल्हा परिषद कॉलनी, शहाजी नगर, नांदेड येथे प्रसिद्ध गायक प्रा. अभिजीत रत्नाकर आपस्तंब आणि प्रसिद्ध गायिका सौ. सारिका आपस्तंब – पांडे यांच्या ‘गीतरामायण’ कार्यक्रमाने नांदेडकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या दोनही कार्यक्रमास नांदेडकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोघांनीही सादर केलेल्या गीतरामायणातील एकापेक्षा एक सरस अश्या गीतांनी अवघे वातावरण ‘ राममय ‘ करून टाकले.


स्व. ग.दि. माडगूळकर आणि स्व. सुधीर फडके (बाबूजी) यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण’ आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. या कार्यक्रमाचे निवेदन श्री. सुधीर पूरकर, सौ. अंबालिका शेटे, तबला साथ चेतन पांडे, संवादिनी साथ लक्ष्मीकांत धानोरकर, साईड रिदमवर सचिन शेटे, कोरसवर सौ. जयश्री आजेगावकर – शेटे, सौ.मानसी मांजरमकर – आपस्तंब व कु. उन्मनी बोरीकर यांनी उत्कृष्ट साथसंगत करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमास स्थानिक रहिवासी नागरिकांसोबतच नांदेड येथील सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती लाभली होती.

