
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे संगीतमय हनुमान जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.पहाटे साडेपाच दरम्यान सुरू झालेल्या भावपूर्ण गायन आणि तितकच मन तल्लीन करणारं वादन या दुहेरी अप्रतिम सांगीतिक मैफिलीचा आनंद घेण्यासाठी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूर्योदयावेळी पहिल्यांदाच सप्तसुरांच्या मुक्त उधळणात गुलालाची देखील उधळण करत सांगीतिक सेवेत सुरू असलेला हनुमान जन्मोत्सव सोहळा बरबडेकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. गायक शिवकुमार मठपती, जयपाल मठपती आणि शितल जामगे यांनी गायलेल्या एकापेक्षा एक सरस विविध मराठी भक्ती-गीतांच्या व हनुमानजी वर आधारित गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित हनुमान भक्तांची मने जिंकून घेतली.


भक्तांकडून देखील टाळ्यांच्या कडकडाटासह जोरदार प्रतिसाद मिळाला. गीतकार ग.दि. माडगूळकर यांच्या “कानडा राजा पंढरीचा” या गीताची रचना शिवकुमार मठपती यांनी गायली यावेळी त्यांच्या गायकीने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. तसेच शितल जामगे आणि जयपाल मठपती यांनीही त्यांच्या गायानातून उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले.


तबल्यावर प्रा. स्वप्निल धुळे,ढोलक समाधान राऊत,ऑक्टोपॅड आदित्य डावरे, कीबोर्ड राज लामटीळे आणि अजय शेवाळे बरबडेकर आदींची अप्रतिम संगीतसाथ या कार्यक्रमाला लाभली होती. कार्यक्रमानंतर हजारो भक्तांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला.दरम्यान याच याच दिवशी पोच्चमा देवी मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी यात्रा आयोजित करण्यात आली होती. तसेच यात्रेनिमित्त कुस्तीची दंगल ही भरवण्यात आली होती. जिल्हाभरातून अनेक मल्ल या कुस्तीच्या दंगलीत सहभागी झाले होते.

