
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षे झाले असले तरी विमुक्त जाती, भटक्या जमाती व अठरापगड जाती जमातीच्या नागरिकांना संख्येच्या प्रमाणात राजकीय सत्तेची भागीदारी मिळाली नसून प्रस्थापीतांच्या गुलामगिरीतच आजही उपेक्षित घटक खितपत पडला असून त्यांना राजकीय सत्तेत संख्येप्रमाणे भागीदारी मिळवून देण्यासाठी समनक जनता पार्टी काम करेल असे प्रतिपादन समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संपत चव्हाण यांनी केले.


माहूर येथे दि. ९ रोजी समनक जनता पार्टी या नवीन राजकीय पक्षाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील हे होते तर उद्घाटक तपस्वी योगानंद महाराज, व प्रमुख उपस्थिती शशिकलाबाई काशिनाथ राठोड नायकळ गोरसिकवाडी भारत, गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, दशरथ बाब राऊत, रामकृष्ण कालापाड, अॅड. शिवराज खंकरे, फकीरा दलाचे प्रदेशाध्यक्ष सतीश कसबे, मंगेश औताडे, नंदेश अंबाळकर, सुनील गोटखिंडे, देवराज चव्हाण मध्यप्रदेश, आत्माराम जाधव प्रदेशाध्यक्ष बंजारा टायगर संघटना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तीन एकर जागेत उभारलेला मंडप महिला, पुरुष युवक युवती च्या गर्दीने तुडूंब भरला होता.


पुढे बोलतांना प्रा. चव्हाण म्हणाले की, स्वतंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात स्व. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री बंजारासमाजाने दिले. त्यांनी उपेक्षित वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र ते एक प्रस्थापीत लोकांच्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांना अनेक प्रकारे अडथळे आले. त्यामुळे सरकारही आपले विचारही आपला असे सरकार आणण्यासाठी समनक जनता पार्टी ही छोट्या छोट्या जाती समुदायाच्या सर्व सामाजिक संघटनांची मोट बांधून यापुढे ताकदीने व एकजुटीने राजकीय प्रवास करणार असल्याचे सांगितले.


सर्व प्रथम संविधान प्रस्ताविक वाचन दीप प्रज्वलन व समनक विशेषांक प्रकाशन करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख उपस्थितांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना विशेषत्वाने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षावर प्रस्थापितांचा पक्ष म्हणून म्हणून घणाघाती टीका केली. प्रस्थापित पक्षांनी उपेक्षितांना संख्येच्या प्रमाणात भागीदारी न दिल्यानेच व गोरसिकवाडी चळवळीचे जनक स्व. काशिनाथ नायक यांचे १४ हेतूपैकी एक हेतू हा राजकीय पक्षाच्या माध्यमातून उपेक्षितांना राजकीय सत्तेत वाटा मिळवून देणे हा असल्याने त्यांची व्दितीय पुण्यस्मरण दिनाच्य निमित्याने समनक जनता पार्टी चे लोकापर्ण आज माहूर तीर्थक्षेत्रावरून रेणुकामातेचा आशीर्वाद घेऊन करण्यात येत असल्याचे शेशिकलाबाई राठोड यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रफुल जाधव, अतुल राठोड उकंड पवार अरविंद राठोड व माहूर किनवट तालुक्यातील गोर सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
