
दि ११ ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीत तीन दिवस फुले शाहू आंबेडकरी विचारांचा शासनातर्फे जागर


नांदेड। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी जलसा, २०२३ चे आयोजन शासनामार्फत करण्यात आलेले आहे. नांदेड येथील तक्षशीला बुद्धविहार मैदान, भागीरथ नागर, जंगमवाडी नांदेड , येथील प्रांगणावर हा कार्यक्रम दिनांक ११ एप्रिल २०२३ ते १३ एप्रिल २०२३ या कालावधी दरम्यान तीन दिवस रंगणार आहे.


फुले शाहू आंबेडकरी जलसाचा संगीतमय कार्यक्रम नांदेड शहरातील तक्षशीला बुद्धविहार मैदान, भागीरथ नागर, जंगमवाडी नांदेड आयोजित करण्यात आलेला आहे . या महोत्सवात मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी महात्मा फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर शाहिर सीमा पाटील, नागसेन सवदेकर व डॉ.मधुकर मेश्राम व सहकलाकार फुले शाहू आंबेडकरी गीते व गझल सादर करतील. या जलसामध्ये प्रबोधनात्मक फुले शाहू आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम होणार आहे .


दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी सुप्रसिद्ध गायक मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, कुणाल वराळे, गौरव जाधव, हे आंबेडकरी जलसा सादर करतील तर शाहिर संतोष साळुंखे व सहकलाकार राजर्षी शाहू महाराज यांच्यावर आधारित जोशपूर्ण शाहिरी पोवाडा सादर करतील. दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी सुप्रसिद्ध शाहीर मीरा उपम, महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबी, प्रसेंजित कोसंबी, सत्यजित कोसंबी व सहकलाकार फुले शाहू आंबेडकरी गीतांच्या गायनाने या जलसाची सांगता होणार आहे.

नांदेड येथे होऊ घातलेल्या या फुले-शाहू-आंबेडकरी जलसामध्ये सहभागी कलाकाराचा किंबहुना या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या परिसंवादाचा तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकाराच्या कलापथकाचा, शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन बिभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
