
हदगाव। वृक्ष लागवड योजनेत मोठा भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणावरून चौकशी चालू असलेल्या हदगाव येथील सामाजिक वनीकरण विभागाकडून रखरखत्या उन्हाळ्यात आष्टी गटातील वटफळी, बोरगाव, लिंगापूर ,टाकळा इत्यादी भागातील रस्त्याच्या कडेने १०/०४ रोजी सोमवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जात आहे. भर उन्हाळ्यात आणि तेही पहिल्यांदाच सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत असल्याचे पाहून रस्त्यावरील प्रवाशांना या नवलाचा चांगलाच धक्का बसला असून ” ऐकावं ते नवलच ” म्हणत उन्हाळ्यात वृक्ष लागवड हा तालुक्यात एक चर्चेचा विषय बनला आहे.


दरवर्षी जून, जुलै महिन्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते पण यावर्षी चक्क एप्रिल महिन्यात अन् तेही रखरखत्या उन्हाळ्यात वृक्ष लागवड करण्याचा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याने वृक्ष लागवडीतील भ्रष्टाचाराच्या चर्चेला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करत राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत हदगाव तालुक्यात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून हदगाव सामाजिक वनीकरण विभागाची वृक्ष लागवड योजनेतील तथाकथित भ्रष्टाचाराची चौकशी काही दिवसापासून चालू आहे.


चौकशीच्या फेऱ्यात हदगावचे सामाजिक वनीकरण विभाग चांगलेच अडचणीत सापडले आहे. कदाचित त्यामुळेच सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदपत्रे झाडे लावल्याची दाखवून झाडे लावलीच नसलेल्या ठिकाणी चौकशीच्या तोंडावर झाडे लावून सावरासावर केली जात असल्याचे चित्र आहे. किंबहुना चौकशीच्या पार्श्वभूमीवरच रखरखत्या उन्हाळ्यात वृक्ष लागवड केली जात आहे. ती झाडे वाढविण्यासाठी नाही तर शासनाला चुना लावण्यासाठी असल्याचे वाटसरू उघडपणे बोलत आहेत.


हदगाव सामाजिक वनीकरण विभागाकडून आष्टी जिल्हा परिषद गटातील वटफळी बोरगाव लिंगापूर टाकला या रस्त्याच्या कडेला यापूर्वीही वृक्ष लागवड केल्याचे संबंधितांकडून सांगितले जाते. तर मग लागवड केलेली वृक्ष गायब झाले कसे.? जमिनीने खाल्ले का चोरीला गेले? का वृक्षलाच पाय फुटले ? हे कळायला मार्गच नाही. मात्र चौकशी दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांचे लक्ष जर त्या रस्त्याकडे गेले आणि त्या ठिकाणी लावलेली वृक्ष दिसलीच नाही, तर ऐनवेळी पंचायत होऊ नये म्हणून सामाजिक वनीकरण विभागाकडून चक्क रखरखत्या उन्हाळ्यात वृक्ष लागवड केली जात असल्याचे मानले जाते.
