
नांदेड। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला दोन-तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. दिनांक १६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच अध्यक्षपदाचे दावेदार असलेले सुप्रसिद्ध रंगकर्मी प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे तब्बल २० उमेदवार बिनविरोध आल्याने भावी अध्यक्ष प्रशांत दामले यांची शक्ती वाढवण्यासाठी नांदेड शाखेचे युवा उमेदवार डॉ. राम चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार नाट्य परिषदेच्या मतदारांकडून करण्यात आला आहे.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची महाराष्ट्रातील एकूण साठ जागांसाठी येत्या १६ एप्रिल रोजी लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्यक्षात मात्र मतदानापूर्वी अध्यक्षपदाचे दावेदार असलेले रंगकर्मी प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलचे ६० पैकी तब्बल २० उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या स्थितीत रंगकर्मी प्रशांत दामले यांची या निवडणुकीतील स्थिती भक्कम मानली जात आहे.


नांदेड येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेतून रंगकर्मी प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचे उमेदवार आणि नांदेडचे युवा रंगकर्मी डॉ. राम नारायणराव चव्हाण हे निवडणूक रिंगणात आहेत.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नांदेड शाखेची पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आधीच २० जागा महाराष्ट्रातून निवडून आलेल्या ‘ नाटक समूहाचे’ अध्यक्ष पदाचे दावेदार रंगकर्मी प्रशांत दामले यांना बळ देण्यासाठी नांदेड येथील उमेदवार डॉ. राम नारायणराव चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा मतदारांनी चंग बांधल्याचे बोलले जात आहे.

कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सुद्धा प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ समर्थनार्थ नांदेड शाखेतील उमेदवार डॉ. राम चव्हाण यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडून देण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये प्रशांत दामले, प्रदीप कबरे प्रा. डॉ. गणेशचंद्र चंदनशिवे आदींचा समावेश आहे.
