
हदगाव, शे चादपाशा| महावितरण ने कृषी पंपासाठी करण्यात येणाऱ्या वीज बिलामध्ये ४० ते ५२टक्के पर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ एक एप्रिल पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरण व राज्य सरकारच्या विरोधात असंतोषाचा वनवा भडकला आहे. याबाबतीत शेतकऱ्यांच्या संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे प्रल्हाद पाटील सुर्यवंशी हडसणीकर यांनी सांगितले आहे.


शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी संपूर्ण मोफत आणि २४ तास विजेचा पुरवठा करण्यात येतो. परंतु लागूनच असलेल्या महाराष्ट्रात मात्र केवळ आठ तास आणि कधी दिवसा तर कधी रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. ही तफावत असतांना देखील शेतकऱ्यांनी आतापर्यत प्रतिवर्षी पाच ते दहा हजार रुपये तडजोडीचा भरणा करत वीज वापर सुरु ठेवला आहे. परंतु नुकतेच विजदर नियामक आयोगाने कृषी पंपाच्या दरवाढीला अनुमती दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतिवर्षी, प्रती हॉर्स पॉवर साठी ५५०० रुपये अधिक ईत्तर आकार असे विजबिल आकारण्यात येणार आहे. म्हणजे सर्व मिळून किमान पाच हॉर्स पॉवर मोटार पंपासाठी अंदाजे तीस हजार रुपये आणि दहा हॉर्स पॉवर मोटार पंपासाठी साठ हजार रुपये विजबिल येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हदगांव तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील सांगितले.


याबाबतीत नुकतेच शेतकरी नेत्यांनी महावितरण चे उपविभागीय अभियंता केशव ढवळे यांची भेट घेऊन आलेल्या परिपत्रकाची मागणी केली. परंतु अद्याप उपविभागाला परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान मेलद्वारे आलेल्या इतर माहितीच्या आधारे त्यांनी या वीजदरवाढीला दुजोरा दिलेला आहे. तसेच २०२४-२५ मध्ये यापेक्षाही जास्त दरवाढ म्हणजे ५२% पर्यंत मंजूर झाली असल्याचे त्यांनी प्रकरणी वीजदर वाढ रद्द करावी. यासाठी सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व इतर शेतकऱ्यांच्या नेतृत्व करणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या संयुक्त उपस्थितीत उद्या दिनांक१० एप्रिल रोजी मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्राला हदगाव तहसील कार्यालय निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वीज पंप धारक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर दुपारी एक वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन पंजाबराव देशमुख व शिवाजीराव वानखेडे यांनी केले आहे.

