
नांदेड| सध्या राज्यात पवित्र पोर्टल च्या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक,व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकभरती प्रस्तावित आहे मात्र बिंदूनामावलीमध्ये झालेल्या घसरणामुळे “ईडब्लूएस” व “खुल्या” प्रवर्गातील “टेट” पात्र विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे.


त्यामुळे बिंदूनामावलीचा जो काही घोळ आहे तो राज्यशासनाने जेंव्हा मिटवायचा आहे तेंव्हा मिटवावे मात्र तोपर्यंत प्रस्तावित शिक्षकभरती मध्ये “ईडब्लूएस” प्रवर्गासाठी 10 टक्के व खुल्या प्रवर्गासाठी 40 टक्के आरक्षणानुसारच जागा द्याव्यात अन्यथा सनदशीर मार्गाने नाईलाजास्तव शिक्षकभरती विरोधात कोर्टात जावावे लागेल याची दखल शालेय शिक्षण विभाग व राज्य शासनाने घ्यावी असे मत डी.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन चे राज्य सरचिटणीस श्रीकांत जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.


पुढे बोलताना श्रीकांत जाधव यांनी राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या जवळपास 67 हजार जागा रिक्त असल्याने राज्यातील शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत गेली अनेक वर्षे भरती प्रक्रियाच ठप्प असल्याने अनेक शाळा शिक्षकांविनाच आहेत.आता भरती प्रक्रियेला गती देऊन रिक्त जागांपैकी किमान 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र पुन्हा एकदा बिंदूनामावली खुल्या गटातील इच्छूकांच्या मानगुटीवर बसणार आहे.


यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या शिक्षक भरतीमध्ये 5200 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी जेमतेम 100 जागा आल्या होत्या पण आता हा अन्याय सहन करणार नाही गरज पडल्यास कोर्टाचे दार ठोठावू पण “ईडब्लुएस” व “खुल्या” प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास श्रीकांत जाधव यांनी व्यक्त केला.
