
लोहा| नागदरवाडीसह परिसरातील वाडी तांडे यांना टॅंकर मुक्त करत “पाणीदार” गावे करणारे नागदरवाडी येथील बाबुराव केंद्रे यांना जनशक्ती मंत्रालय भारत सरकारने जलसंधारणासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित केला असुन, या पुरस्काराचे वितरण २९ मार्च रोजी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे.


नागदरवाडी येथील जलतज्ञ बाबुराव केंद्रे यांच्या नागदरवाडी गावात भीषण पाणीटंचाई.. दररोज पाच कि मी ची पायपीट करत ग्रामस्थांना पाणी भरावे लागायचे ….याच पाणीटंचाई मुळे गावातील महिलेचा मृत्यू झाला. उष्माघात होऊन आजारी झाले. अनेक तरुण अविवाहित राहिले, बाबुराव केंद्रे यांचेही लग्न मोडले त्यानंतर मात्र बाबुराव केंद्रे यांनी निश्चय केला गाव पाणीदार केल्याशिवाय लग्न करणार नाही. त्यांनी विविध संस्थांच्या व या क्षेत्रातील तज्ञांच्या भेटी घेतल्या यामध्ये त्यांना बंधु बालाजी केंद्रे यांनी मार्गदर्शन केले व सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाची भेट घडवली संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नागदरवाडी चा कायापालट झाला.


गावात इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम मिळाला मात्र यासाठी काही अटी होत्या. त्यानुसार पुर्ण चराईबंदी, कुर्हाड बंदी, संपुर्ण गावाने श्रमदान करणे या व अशा अन्य काही अटी मान्य करण्यासाठी बाबुराव केंद्रे यांनी गावात ग्रामसभा घेऊन, गावाला पाणीदार करण्याची ही शेवटची संधी आहे. आपण अटी मान्य केल्या तर दोन वर्षात गाव पाणीदार होईल असे सांगून गावातील ग्रामस्थांना तयार केले. यासाठी गावकर्यांना प्रशिक्षण दिले गेले, त्यानंतर संपुर्ण गावाने श्रमदान करत चराईबंदी केली. कुर्हाड बंदी केली. डोंगरावर माथा ते पायथा चर खोदले, नाला बंडींग, मातीनाला बांध, स्टोन बंडींग, अंडरग्राउंड वाटर वे, सिमेंट बंधारे, माती बंधारे, शेततळे, वृक्षारोपण व साठवण तलाव बांधकाम सर्व प्रकारच्या उपाययोजना मुळे गाव पाणीदार झाले.


जे गाव पाण्यासाठी वणवण भटकंती करायचे त्या गावातुन आज ईतर गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावात बारा महिने विहीरी पाण्याने तुडुंब भरुन राहत आहेत. पुर्वी गावात फक्त खरीप हंगाम पिके घेतली जायची आता रबी व उन्हाळी हंगामात पिके घेतली जातात,गाव व परिसर मोठ्या प्रमाणात वृक्षराजींनी नटला आहे. या सर्व बदलाचे श्रेय बाबुराव केंद्रे यांना व त्यांनी घेतलेल्या मेहनतीला आहे. संसारावर तुळशीपत्र ठेऊन… प्रसंगी पत्नीचे दागिने गहाण ठेवून त्यांनी नागदरवाडीच्या पाणी पेरण्याचे काम केले. या सर्व प्रवासात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

बाबुराव केंद्रे यांच्या या संघर्षमय जीवन प्रवासावर प्रसिद्ध अभिनेते आदीनाथ कोठारे यांनी “पाणी ” नावाचा चित्रपट तयार केला आहे. अभिनेते आमीर खान यांच्या “सत्यमेव जयते” या मालिकेत बाबुराव केंद्रे यांची दखल घेण्यात आली संपुर्ण देशभरात त्यांच्या कार्याचे कौतुक झाले. यानंतर नागदरवाडी गावाला आजपर्यंत शेकडो नागरीकांनी भेटी दिल्या आहेत. बाबुराव केंद्रे यांनी यानंतर खिरु तांडा, भिलु तांडा, कलंबर,व ईतर काही गावांमध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मदतीने कामे करण्यात आली. यासाठी रा स्व संघाचे प्रचारक उपेंद्र कुलकर्णी यांनी मदत केली. उपेंद्र कुलकर्णी यांच्या मदतीने नागदरवाडी गावात जल प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते दिपक मोरतळे, नाबार्ड चे डॉ तगत, विनय कानडे, अॅड संगारेड्डीकर यांचीही मदत याकामी झाली आहे.

त्यांच्या या जलसंधारण व पाणीटंचाईवर नैसर्गिक उपाययोजनांच्या मदतीने केलेली मात या कामामुळे त्यांची दखल भारत सरकारने घेतली व नुकताच त्यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय अर्थमंत्री डॉ भागवत कराड,पर्यावरण प्रमुख गोपाल आर्य,खा.उन्मेष पाटील,खा गोपाळ शेट्टी,खा मनोज तिवारी,श्री सुनील देवधर,तिरुपती बालाजी देवस्थान त्रिदेव स्वामी,ब्राम्हकुमारी संचालिका आशा दीदी,अमेय साठे, संजय सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय जलप्रहरी पुरस्काराने बाबुरावजी केंद्रे यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनाही जलसंधारण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
