नांदेड। २००८ च्या महागाई विरोधात आंदोलन प्रकरणात नांदेडच्या १९ शिवसैनिकांना नांदेड सत्र न्यायालयाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली असून, आपण सर्व शिवसैनिकांच्या सोबत असून, शिवसैनिकांना वार्यावर सोडणार नाही, याबाबत वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी प्रतिक्रियेत म्हंटले आहे.
२००८ च्या एका राजकीय आंदोलनाच्या संदर्भात नांदेडच्या न्यायालयाने माजी आमदार अनुसया खेडकर. सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, विधानसभा प्रमुख महेश खेडकर, उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे पाटील,नरहरी वाघ यांच्यासह १९ जणांना सक्तमजुरीची शिक्षा व दंड ठोठावला आहे. हे वृत्त आज नांदेडच्या शिवसेना पदाधिकार्यांकडून कळताच ही बाब आपण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कानावर टाकून त्यांच्याशी चर्चा केली आहे. या सर्व प्रकरणात शिवसेना या सर्व शिवसैनिकांच्या पाठिशी खंबीर उभी असून, कुठल्याही शिवसैनिकांना आम्ही वार्यावर सोडणार नाही.
कायदे तज्ज्ञांशी चर्चा करुन सदर प्रकरणात वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येईल. एखाद्या राजकीय आंदोलनात शिवसैनिकांना अशा प्रकारे टार्गेट करुन त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत सर्व कायदेशीर माहिती लगेच घेवून वरच्या न्यायालयात याबाबत दाद मागण्यात येईल. जिल्ह्यातील शिवसैनिकांना आम्ही वार्यावर सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी दिली आहे.