
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून देशभरात वंदे भारत यासारख्या वेगवान रेल्वे धावत आहेत. भविष्यात संपूर्ण भारतात ही रेल्वे सर्व ठिकाणी धावेल असे मानले जात आहे. यासाठी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आवश्यक आहे. देशभरात त्यामुळे रेल्वेचे विद्युतीकरण करण्यावर सर्वत्र जोर दिला जात आहे. विद्युतीकरणाचे काम म्हणावे तेवढे सोपे नाही. परंतु येत्या काही वर्षात जास्तीत जास्त मार्गावर विद्युतीकरण असेल, असे सांगितले जाते. मराठवाड्यातदेखील विद्युतीकरणावर जोर दिला जात आहे . मराठवाड्यातील अनेक रेल्वे मार्ग सध्या प्रलंबित असून हे रेल्वे मार्ग करत असताना विद्युतीकरणासह पूर्ण झाल्यास भविष्यात अशा वेगवान रेल्वेंना मराठवाड्यातील रुळांवर जागा मिळेल, असे मानले जाते.


रेल्वेचा प्रवास हा आरामदायी मानला जातो. त्यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्राधान्य देतात. ज्या – ज्या ठिकाणी रेल्वेची सुविधा आहे, त्या ठिकाणी रेल्वेने प्रवास करणे म्हणजे सोयीस्कर मानले जाते. मराठवाड्यातील नांदेड येथे १ एप्रिल २००३ मध्ये नांदेड डिव्हिजनची स्थापना करण्यात आली. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद डिव्हिजनचे खूप मोठे असलेले क्षेत्र तोडून वीस वर्षांपूर्वी मराठवाड्यासाठी नांदेड डिव्हिजनची स्थापना करण्यात आली. मराठवाड्यातील रेल्वेविषयक समस्यांसाठी ज्येष्ठ संपादक तथा रेल्वेचे गाढे अभ्यासक कै. सुधाकरराव डोईफोडे यांनी वारंवार पुढाकार घेतला. त्यांनी केलेला पाठपुरावा तसेच जनतेचा रेटा यामुळे मराठवाड्यात ब्रॉडगेजला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.


माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची त्यांना योग्य साथ मिळाल्याने मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्न त्या काळात मार्गी लागले. नांदेड डिव्हिजनची स्थापना झाल्यानंतर मराठवाड्यातील रेल्वेमार्गांचे प्रश्न अद्यापही कायमच आहेत. मराठवाडा निजामांच्या तावडीतून स्वतंत्र झाल्यानंतर आजपर्यंत मराठवाड्यात एकही किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग झालेला नाही. नॅरो गेज असलेल्या रेल्वेमार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. नवीन रेल्वेमार्ग मंजूर झालेत परंतु ते पूर्णत्वास गेलेले नाहीत. काही दिवसापूर्वीच मराठवाडा जनता विकास परिषदेच्यावतीने नवी दिल्ली येथे रेल्वेविषयक समस्या मांडण्यात आल्या. त्या शिष्टमंडळात डॉ. व्यंकटेश काब्दे, संपादक शंतनू डोईफोडे, व्यापारी संघटनेचे हर्षद शहा यांच्यासह इतरांचा समावेश होता. त्यांनी मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांची संपूर्ण माहिती दिल्लीत सादर केली.


परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरणासह झाल्यास या भागातही वंदे भारत ही रेल्वे धावू शकेल. नांदेड ते लातूर रोड या मार्गावर नवीन लाईन टाकण्यात येणार आहे. नांदेड ते बिदर या नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती देगलूर मार्गे केली जाणार आहे . हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने ५० टक्के वाटा देण्याचे जाहीर केले आहे. नांदेड ते पुसद या नवीन रेल्वे मार्गासाठी निधी नसल्याने हे काम देखील पूर्णपणे रखडले आहे. पूर्णा ते अकोला या मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या मार्गाचे दुहेरीकरण झाल्यास संपूर्ण भारताला हा एक वेगवान व चांगला मार्ग जोडला जाणार आहे .

मराठवाड्यातील हे रेल्वेप्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. परंतु हे काम देखील कधी पूर्ण होणार याचा अंदाज नाही. सध्या ज्या गतीने काम सुरू आहे, त्या गतीने काम झाल्यास किमान आठ ते दहा वर्षे किंवा अधिकचा काळ लागेल, असा अंदाज आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजनअंतर्गत सध्या १४० रेल्वे धावतात. यामधील निम्म्यापेक्षा अधिक रेल्वे गाड्यांची अवस्था खूपच बकाल आहे. येथून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील स्वच्छतेच्या बाबतीत न बोललेलेच बरे , असे शेकडो प्रवासी बोलून दाखवितात. पंधरा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी नगर येथून निघालेल्या रेल्वेमध्ये एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह रेल्वेच्या बाथरूममध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणातही रेल्वे पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेतले .

परंतु त्या खुनाचा उलगडा अद्यापही लागलेला नाही. स्वच्छता व सुरक्षितता याबाबतीत नांदेड डिव्हिजनमधील सेवा पूर्णपणे नापासच आहे ,असे म्हटले तर ते खोटे ठरणार नाही. रेल्वेतील स्वच्छता व सुरक्षितता ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. रेल्वेतील वातानुकूलित डब्यांमध्ये दिला जाणारा बेडरोलदेखील अत्यंत खराब दर्जाचा असतो. एसी थ्री टीयर या डब्यांमध्ये दिला जाणारा बेडरोलदेखील जुन्याच न धुतलेल्या चादरींचा असतो. याबाबतीत देखील रेल्वेच्या ऑनलाईन नंबरवर सर्वाधिक तक्रारी झाल्याची नोंद आहे. तक्रार करणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांचे समाधान केले जात असले तरी तक्रारी उद्भवू नये , यासाठी रेल्वे विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
मराठवाड्यातील लातूर येथे रेल विकास निगम लिमिटेडतफे रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना सुरू आहे. लातूरचा भाग हा सोलापूर डिव्हिजनमध्ये येतो. त्या ठिकाणी रेल्वे विभागाच्या कारखान्यातून मोठ्या संख्येने रेल्वेचे डबे तयार होणार आहेत. विशेष म्हणजे या कारखान्यातून वंदे भारत रेल्वेचे सोळाशे कोच तयार होणार आहेत. प्रत्येक कोचसाठी आठ ते नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा जंक्शन या ठिकाणी रेल्वे विभागाची किमान दोनशे एकर जागा शिल्लक आहे.
अशाच प्रकारे हिंगोली येथे देखील अडीचशे एकर जागा रेल्वे विभागाची रिकामी पडून आहे. या जागेतही भविष्यात का होईना परंतु रेल्वेचे कोच बनविण्याचा अजून एक कारखाना सुरू होऊ शकतो.संपूर्ण देशभरात रेल्वे विभागातर्फे येत्या पाच वर्षात ९०० वंदे भारत रेल्वे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने मराठवाड्यातील रेल्वेच्या शेकडो एकर रिकाम्या जागेचा वापर होऊ शकतो व मराठवाड्याचे रूपही पालटू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने का होईना परंतु भविष्यात मराठवाड्याचे चित्र पलटणार आहे, हे नक्की.
….डॉ. अभयकुमार दांडगे, नांदेड, मराठवाडा वार्तापत्र, ९४२२१७२५५२, abhaydandage@gmail.com
.