
कंधार, सचिन मोरे। मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असून गेल्या ३० वर्षापासून पक्षाचे काम सक्रियपणे करीत आहे.मी या काळात अनेक निवडणुका लढवलेले आहेत.काही वेळेस जिंकलो तर काही वेळेस अल्पमताने पराभूत देखील झालो आहे. अनेक निवडणुकांचा प्रचार प्रमुख म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. पक्षाने माझा सन्मान करत पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर मला विराजमान केले आहे.


एवढा मोठा अनुभव गाठीशी असताना माझी जन्मभूमी असलेल्या लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाची झालेली दुरावस्था मला पाहवत नव्हती. त्यामुळे या भागातील जनतेस न्याय देण्यासाठी सर्व ताकदीनीशी लोहा-कंधार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकचे माजी स्थायी समिती चे सभापती एकनाथदादा पवार यांनी व्यक्त केला.


राजकीय चळवळीचे माहेरघर असलेल्या कंधार तालुक्यातील फुलवळ येथील महादेव मंदिरामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा सूर्योदय मन्याड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली फुलवळ सर्कल मधील कार्यकर्ता मेळावा व पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन दि.१६ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले होते.या कार्यक्रमास सूर्योदय मन्याड फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष बालाजी परदेशी,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य दत्ताभाऊ शेंबाळे,शिवसांब देशमुख,ब्रह्मानंद पाटील शिरसाट,सुंदर सिंग जाधव,नाना चिवळे ,मोतीराम पा तोरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पवार म्हणाले मी गेल्या चार वर्षापासून लोहा-कंधार मतदार संघातील अनेक गाव.वाडी.तांड्यावर गेलो आहे.


वाडी तांड्यावर गेल्या अनेक वर्षापासून रस्ते,पाणी,शिक्षण,सिंचन,रोजगार, आरोग्य या विषयाच्या समस्या आजही कायम आहेत. अनेक निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा निवडणुका दर पाच वर्षाला होत असतात या निवडणुकांमध्ये मतदारसंघातील जनतेस लबाड बोलून फसवण्याचे काम येतील लोकप्रतिनिधी कडून सतत होत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. कंधार शहर प्राचीन ऐैतिहासिक शहर असून या शहराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. एक काळ राष्ट्रकूट राजाची राजधानी असलेल्या कंधार शहरातील व्यापारपेठ राजकीय हेवे दाव्यातून जमीन दोस्त करण्यात आली आहे.

या शहरातील व्यापार पेठ संध्याकाळी ८ वाजता बंद होते.रात्रीला बाहेरगावी जा-ये करणाऱ्या प्रवाशांचे हाल-बेहाल होतात या शहराला जोडणारा एक ही राज्यमार्ग नाही या सर्व बाबी संताप जनक असून या भागातील भोळ्या-भाबड्या जनतेस वेडे बनवण्याचे महापाप हे लोकप्रतिनिधी करत असून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी आलो असून तुम्ही सर्व मायबाप जनता माझ्यासोबत असताना सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ताभाऊ शेंबाळे यांनी केले तर सुत्रसंचालन धोंडीबा बोरगावे यांनी केले. या मेळाव्यासाठी कंधार – लोहा तालुक्यातील कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
