
नांदेड। ऐतिहासिक वारशाचे जतन व संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वारसा स्थळे निसर्गासोबत माणसाच्या सर्जनशीलता व कलात्मकतेचे दर्शन घडवतात. असा हा समृद्ध वारसा ब्रँड अँबेसिडर होऊन युवकांनी हा वारसा पुढे न्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.


ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांचे जतन करण्यासाठी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तने आज नांदेड येथील नंदगिरी किल्ला येथे कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे intacचे सुरेश जोंधळे, इतिहास तज्ञ प्रा. डॉ. शिवराज बोकडे, प्राचार्य चंद्रकांत पोदार, लक्ष्मण संगेवार, प्रा. सुनील नेरळकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, बंडू अमदुरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.


पुढे ते म्हणाले, ऐतिहासिक व पर्यावरणाचा वारसा पुढे नेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होणे आवश्यक असून हा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी लोकसहभागाची गरज असल्याचेही ते म्हणाले. सध्या सोशल मीडियाचा वापर करून आपण जी काही महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे, किल्ले, लेण्या, मंदिरे पाहतो त्याचे व्हिडिओ शूट करून देखील माहिती जनतेपर्यंत पोहोचू शकतो. यामध्ये शाळेची मोठी भूमिका असून मुलांना देखील याचे महत्त्व कळावे यासाठी प्रश्न प्रश्नमंजुषा सारखे उपक्रम राबवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे बोलताना म्हणाल्या, नांदेड हा समृद्ध जिल्हा असून ऐतिहासिक परंपरा असलेला जिल्हा आहे. जागतिक वारसा दिनाच्या औचित्याने नांदेड जिल्ह्यातील पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, प्राचीन मंदिरे यांचा परिचय असणारी पुस्तिका नांदेड जिल्हा परिषदेने नांदेड
सांस्कृतिक-ऐतिहासिक नावाचे देखील प्रकाशित केली आहे. अजूनही यावर आमचा अभ्यास सुरू असून नवनवीन माहिती वाचकांसाठी देण्यात येणार आहे. शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांना जागतिक वारसा दिनाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्यासाठी त्यांना पर्यटन स्थळे, किल्ले दाखवण्यात येतील असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी इतिहास तज्ञ डॉ. शिवाजी बोडके यांनी ऐतिहासिक वारसा संदर्भात नांदेडसह महाराष्ट्रातील भुईकोट, गडकोट व जलदुर्ग किल्ल्यासंदर्भात ऐतिहासिक माहिती देवून त्याचे महत्त्व विशद केले. यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश जोंधळे यांनी केले. या कार्यक्रमाला सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण पाठक, पाटील, बालासाहेब कच्छवे, राजेश कुलकर्णी, शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या नांदेड सांस्कृतिक-ऐतिहासिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
