हिमायतनगर। नगरपंचायतीवर प्रशासक राज असताना देखील हिमायतनगर शहरातील अनेक भागातील नागरिकांना एप्रिल महिन्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. ही बाब हेरून वार्ड क्रमांक १३ मधील सामाजिक कार्यकर्ते अल्पसंख्यांक विभाग हिमायतनगर तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी यांनी नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते आहे.
हिमायतनगर शहरात मार्च महिण्यापासून पाणीटंचाई जाणवत आहे, असे असताना देखील नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे काही वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. संदर्भात येथील नगरपंचायत प्रशासनाने कुठलाही कृती आराखडा अद्याप तयार न केल्यामुळे शहरातील अनेक प्रभागांमधील नागरिकांना एन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या मोठ्या झळा सोसाव्या लागत आहेत.
किमान आपल्या वॉर्डातील नागरिकांना तरी टंचाई पासून दिलासा मिळावा म्हणून शहरातील नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक १३ मधील सामाजिक कार्यकर्ते, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे समर्थक फेरोज खुरेशि हे मागील तीन वर्षांपासून वॉर्डातील नागरिकांना स्वखर्चाने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांतून सामाजिक कार्यकर्ते कुरेशी यांच आभार मानत आहेत.