
माहूर/नांदेड। उद्घाटक म्हणून बोलताना शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी साहित्य व शिक्षण यांचा अनुबंध मांडला. शिक्षण आणि साहित्य यांच्या समन्वयातून उज्वल समाजनिर्मितीसाठी शिक्षक साहित्य संमेलन उपयुक्त ठरेल असे मत दिग्रसकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केले .


” शिक्षक हा साहित्याचा सर्वात मोठा वाहक असतो , शाळा या साहित्य वहनाचा केंद्रबिंदू व्हाव्यात ” अशी अपेक्षा शिक्षक साहित्य संमेलनांचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केली . “वाचनसंस्कार घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतल्यास साहित्य व वाचनाबाबतची चिंता दूर होईल अशी पुस्तीही त्यांनी पुढे बोलताना जोडली.


अ.भा. शिक्षक साहित्य कला व क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले . जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले व्यासपीठावर द.भ.प. साईनाथ वसमतकर महाराज, अ.भा. शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नटराज मोरे, स्वागताध्यक्ष रविंद्र जाधव, ज्ञानोबा बने, डॉ.विलास ढवळे, संतोष शेटकार , सुचिता खल्लाळ, सुधीर गुट्टे, मिलिंद व्यवहारे, विरभद्र मिरेवाड, उत्तम कानिंदे , निमंत्रक रमेश मुनेश्वर आदी उपस्थित होते.


नियोजित उद्घाटक जि.प.च्या मुख्य कार्यकार अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दूरध्वनीवरून उपस्थितांशी संवाद साधला . जि.प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले . “विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्याचा शिक्षक हाच त्याचा साहित्यिक असतो. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या प्रतिभेचा शोध घेण्याचे काम शिक्षकाने केले पाहिजे . बालकांच्या प्रतिभेला न्याय देणारा शिक्षक हा साहित्यिकाची निर्मिती करत असतो असे प्रतिपादन गुडसूरकर यांनी पुढे बोलताना केले. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे संदर्भ देत त्यांच्या सार्वत्रिकरणासाठी चालना देण्याची गरज गुडसूरकर यांनी प्रतिपादन केली . शिक्षक आणि साहित्यिक हे दोघेही निर्मिक असतात. या दोहोंच्या समन्वयाचे प्रतिबिंब म्हणून शिक्षक साहित्य संमेलनाकडे पहायला हवे अशी अपेक्षा त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. यावेळी बोलताना ह.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर म्हणाले,” चैतन्य शक्ती जागृत करणाऱ्याला यश मिळते , साहित्यिक व शिक्षकांनी ही शक्ती जागृत करावी असे आवाहन त्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजित वर्मा आणि प्रसिद्ध वारली चित्रकार मिलिंद जाधव यांचे चित्रप्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. यावेळी अ.भा. शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नटराज मोरे, स्वागताध्यक्ष रविंद्र जाधव, संमेलनाचे निमंत्रक रमेश मुनेश्वर यांची भाषणे झाली. भोला मिलिंद यांनी साहित्य गौरव गीत सादर केले . राजेंद्र चारोडे व मिलिंद कंधारे यांनी सुत्रसंचालन केले तर शेषराव पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्याम राठोड, दिंगबर जगताप, गौतम सावंत, अरुण धकाते, धनंजय गिर्हे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, सुधीर जाधव, सागर चेक्के , विजय घाटे, सुरेश शेरे, विनोद सुरोशे, फाल्गुनी ढवळे, भाग्यवान भवरे, भोला सलाम, प्रविण वाघमारे, अविनाश सिंगणकर, आदिनी परिश्रम घेतले.

चैत्रपालवीत ग्रंथ दिंडीला मोठा प्रतिसाद ! शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांचे सादरीकरण, माय मराठीच्या जयजयकाराच्या घोषणा यासह मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीने शिक्षक साहित्य संमेलनाची सुरुवात झाली.
अ.भा.शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंचच्या वतीने आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन माहूर येथे करण्यात आले होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून माहूर शहरात भारतीय संविधानाची प्रत ठेऊन ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसुरकर, सौ. रुपा गुडसूरकर जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर, स्वागताध्यक्ष तथा गटशिक्षणाधिकारी रविंद्र जाधव, अ.भा. शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नटराज मोरे, संमेलनांचे निमंत्रक रमेश मुनेश्वर, ग्रंथदिंडी प्रमुख बाबुराव माडगे, नामदेव राठोड, शेषराव पाटील, आदी उपस्थित होते..

हर घर नर्सरी, घर घर नर्सरी या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते बीजारोपण करुन या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.