
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या भारतीय स्टेट बँकेतून हिमायतनगरच्या एका भूसार व्यापाऱ्याच्या मुनिमाकडून उलाढाल केल्या जाणाऱ्या लाखोंच्या रक्कमेवर बैंकेत ग्राहक म्हणून दाखल झालेल्या तीन महिलांनी गर्दीची संधी साधून डल्ला मारला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा तपास हिमायतनगर पोलीस करत आहेत. मात्र या घटनेमुळे बैंकेत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हि बाब लक्षात घेता बँक प्रशासनाने येथे बंदूकधारी सुरक्षा गार्डची नेमणूक करावी अशी मागणी आत जोर धरू लागली आहे.


याबाबत पोलीस सूत्रांकडून व रक्कम चोरीला गेल्यानंतर तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार हिमायतनगर शहरातील भुसार व्यापारी व्यंकटेश ऊर्फ राजीव बंडेवार यांचे लाखोंचे व्यवहार बैंकेमार्फत चालतात. सध्या शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्रीचे व्यवहार वाढल्याने खरेदी केलेल्या मालाच्या बदल्यात शेतकऱ्यांना रक्कम द्यावी लागणार असल्याने दि.१८ एप्रिल रोजी सकाळी राजीव बंडेवार यांनी आपल्या दुकानातील मुनीमाकडे धनादेश देऊन बैन्केतून साडेचार लाख रुपये उचलून आणण्यास सांगितले. त्यांचा मुनीमा सदरील धनादेश देऊन बँकेतून रक्कम उचलली. दरम्यान त्यांना फोन आल्यामुळे ते फोनवर बोलत असल्याचे पाहून बॅगमध्ये असलेल्या रकमेतून तब्बल अडीच लाख रुपये याच बैंकेत ग्राहक म्हणून दाखल झालेल्या अज्ञात तीन महिलांनी काढून घेतल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.


काही वेळातच गायब झालेल्या रकमेची वस्तुस्थिती सादर मुनिमाने मालकास सांगितल्यानंतर व्यापारी व्यंकटेश बंडेवार यांनी या घटनेची तक्रार हिमायतनगर पोलिसांना दिली. यावेळी तातडीने पोलीस अधिकारी कर्मचारी बैंकेत दाखल झाले. आणि बँकेतील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. यामध्ये तीन महिलांनी सदर रक्कम गायब केल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांकडून त्या महिलांचा शोध घेणे सुरु आहे.


याबाबत पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, १८ एप्रिलला भूसार व्यापारी राजीव बंडेवार यांच्या मुनीमाच्या बॅगेमधून अडीच लाख अज्ञात तीन महिलांनी चोरल्याचे सीसी टीव्ही तपासातून पुढे आले आहे. अशीच घटना शेजारच्या हिंगोलीत घडली असून, या घटनेतील महिला त्याच असल्याचे तपासात आढळून आले आहे. लवकरच त्या पकडल्या जातील असेही त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले.
सुरक्षेसाठी बैंकेने बंदूकधारी सुरक्षा गार्डची नेमणूक करणे गरजेचे
हिमायतनगर येथील दोन राष्ट्रीयकृत बैंकेचे एकत्रीकरण झाल्यानंतर भारतीय स्टेट बैंकेत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. परंत्तू येथे येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी बैंकेतर्फे कोणतीही व्यवस्था नसल्याने बैन्केतून रक्कम चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी अश्याच प्रकारे एका महिलेच्या पर्समधून रक्कम चोरीला गेली होती. त्यानंतर नुकतीच एका व्यापार्याची लाखोंची रक्कम चोरीला गेली आहे. या घटना लक्षात घेता हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेत एक बंदूकधारी सुरक्षा गार्डची नेमणूक करून ग्राहकांना सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी, नागरीकातून व्यक्त केल्या जात आहे.
