
नांदेड| येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी भक्कम आहे.तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर जागा वाटपाचा फार्मुला ठरला असून काँग्रेस १३, राष्ट्रवादी ३ तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष २ जागा लढवणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बबन बारसे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत.


धर्मराज देशमुख यांनी उमेदवारी मागे घेतली तर निवडणुकीच्या तोंडावर गांधी पवार यांनी भाजपाला दिलेली सोडचिट्टी हा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर तर,नारायण कदम यांची निवडणुकीतील माघार हा शिवसेना शिंदे गटाचे आ.बालाजी कल्याणकर यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.यावरून महाविकास आघाडीत फील गुड तर भाजपा-शिवसेना शिंदे गटात फील बॅडचे वातावरण दिसून येत आहे.


जिल्ह्यातील नांदेडसह पाच बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांच्या बैठका पार पडल्या यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष जागा वाटपासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खा. विनायक राऊत, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सांवत, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, महानगराध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्यातील बोलणीतुन जागा वाटपाचा फार्मुला ठरला असून काँग्रेस १३,राष्ट्रवादी ३ तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष २ जागा लढवणार आहे.


महाविकास आघाडीच्या वतीने सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण ७ जागेसाठी गांधी पवार,निलेश देशमुख,श्यामराव टेकाळे, नागोराव आढाव,सत्यजित भोसले या पाच काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवानराव आलेगावकर तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे भुजंग पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.सेवा सहकारी संस्था महिला मतदारसंघातून गायत्री गजानन कदम (काँग्रेस )तर कमल रंगनाथराव वाघ (राष्ट्रवादी काँग्रेस )सेवा सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती-निळकंठ मदने (काँग्रेस ) ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण-गंगाधर शिंदे (काँग्रेस ) संजय लहानकर (काँग्रेस) ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती-जमाती-नाना पोहरे (राष्ट्रवादी काँग्रेस ), ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिक दुर्बल घटक – ज्ञानेश्वर बाबुराव राजेगोरे (काँग्रेस ) आडत व व्यापारी मतदारसंघातून सदाशिव देशमुख (काँग्रेस ),ओमप्रकाश पोकर्णा (काँग्रेस ) तर हमाल मापाडी मतदार संघातून भुजंग कसबे (काँग्रेस ) निवडणूक लढवत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे बबन बारसे बिनविरोध
सेवा सहकारी संस्था इमाव मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बबन बारसे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.मतदानापूर्वीच महाविकास आघाडीने बारसेच्या विजयाच्या माध्यमांतून विजयाचे खाते उघडले आहे.सद्याचे वातावरण पाहता अन्य मतदारसंघातही महाविकास आघाडीच बाजी मारेल असा विश्वास काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.