
लातूर| शेतीसाठी लागणारे बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करतांना फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच पावतीसह खरेदी करण्याचे आवाहन लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.


शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना – गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट भेसळयुक्त बियाणे, खते व किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडूनच पावतीसह खरेदी करावे. खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्टण, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडेसे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सीलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करुन घ्यावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी.


त्याचबरोबर कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करुन घ्यावी. आपल्या तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ई-मेल, एसएमएस इ. व्दारे शासनाच्या गतिमान गुण नियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. तसेच कृषी निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी, मार्गदर्शनासाठी विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा. निविष्ठा केंद्रांनी कापूस बियाणे, खताच्या किंमतीचे डीजीटल इतर प्रकारचे बोर्ड तयार करुन लावावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.


कृषी निविष्ठांची तपासणी आणि संनियंत्रणासाठी भरारी पथकाची स्थापना
लातूर विभागातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत व योग्य किमतीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. सन 2023-2024 खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठांची तपासणी आणि संनियंत्रण अधिक परिणामकारक होण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले. निविष्ठांचे वितरण योग्यरितीने होण्यास व त्याचे सनियंत्रण करण्यासाठी तालुका, जिल्हा तसेच विभाग स्तरावर भरारी पथके स्थापन केली जातात. या भरारी पथकात तंत्र अधिकारी(गुण नियंत्रण) पी.व्ही.भोर पथक प्रमुख, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस. एच. मोरे सदस्य सचिव तर कृषी अधिकारी (निविष्ठा पुरवठाचे कामकाज पाहणारे) ए. एन. तिडके आणि वैधमापनशास्त्रचे प्रतिनिधी पथकातील सदस्य आहेत.

संपूर्ण विभागात सर्व निविष्ठांचे व्यवस्थित वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, शेतकऱ्यांची निविष्ठांसाठी अडवणूक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे. त्याचबरोबर कृषी निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, जादा दराने विक्री असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित, रद्द करण्यासाठी परवाना प्राधिकाऱ्याकडे प्रस्ताव देणे, तसेच गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करणे, यासारखे गुण नियंत्रण कामासाठी खात्याने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे भरारी पथकाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

कृषी निविष्ठांच्या अडचणी निराकरणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने खरीप हंगामात येणाऱ्या अडचणीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये कार्यरत राहील. या कक्षाचा संपर्क क्रमांक (भ्रमणध्वनी) 8446117500 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 असा आहे. त्याचबरोबर contralroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवर सुध्दा अडचणी नोंदविता येणार आहे.

विभागस्तरावर सुध्दा संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून विभागीय कृषी सहसंचालक, लातूर कार्यालयाचे तंत्र अधिकारी(गुण नियंत्रण) पी.व्ही.भोर(मोबाईल क्रमांक 7972428581), विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस. एच. मोरे (मोबाईल क्रमांक 9422409786), कनिष्ठ लिपिक एल. आय. कदम (मोबाईल क्रमांक 9890970419) सदर कक्षाचे संनियंत्रण करणार आहेत. निविष्ठांच्या उपलब्धतेबाबत तसेच अडचणी व तक्रारीबाबत वरील संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे लातूरचे, विभागीय कृषी सहसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
शेतकरी, वितरक व विक्रेते यांच्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना
लातूर विभागातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांच्या अडचणी व तक्रार निवारणासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, लातूर विभाग, लातूर (शिवाजी चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठिमागे) या कार्यालयात असलेल्या गुण नियंत्रण कक्षात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
तक्रार निवारण कक्षाचे संपर्कात तंत्र अधिकारी(गुण नियंत्रण) पी.व्ही.भोर(मोबाईल क्रमांक 7972428581) तसेच विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस. एच. मोरे (मोबाईल क्रमांक 7588942677) राहतील. तर लक्ष्मण कदम (मोबाईल क्रमांक 9890970419) पूर्ण वेळ उपलब्ध असून त्यांच्याशी शेतकरी, वितरक व विक्रेते यांच्या काही अडचणी, तक्रार असल्यास अथवा माहिती हवी असल्यास संपर्क साधावा. तसेच कृषी विभागाचा टोल क्रमांक फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधता येईल, असे लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.