
नांदेड। भारतीय डाक विभागामार्फत महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे. ही योजना नारी शक्ती मोहिमेअंतर्गत घोषित करण्यात आली. महिला व मुलीच्या भवितव्यासाठी ही योजना भक्कम आधार ठरणारी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधिक्षक आर.व्ही. पालेकर यांनी केले.


ही योजना प्रामुख्याने महिलांसाठी व मुलीसाठी आहे. या योजनेचे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले जाऊ शकते. महिला या योजनेत 2 वर्षांसाठी किमान 1 हजार रुपये ते जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत रक्कम गुंतवू शकतात. कोणतीही महिला किंवा मुलगी या योजनेत खाते उघडून 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकते.


या योजनेत शासनाने घोषित केलेले व्याज दर वार्षिक 7.5 टक्के आहे. व्याज हे चक्रवाढ असून एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40 टक्के रक्कम एकदाच काढता येईल. अपवादात्मक परिस्थीतीत खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही असे डाक विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

