
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमने सामने आलेल्या काँग्रेस आणि भाजपाने उमेदवारी अर्ज माघार घ्यायच्या दिवशी तलवारी म्यान केल्या. काँग्रेसने दहा जागेवर तर भाजपने सहा जागेवर तडजोडी करून निवडणूक बिनविरोध केली आहे. भविष्यातील राजकीय समिकरणे जुळवण्यासाठी भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे कुंटूर बाजार समितीच्या निवडणुकीत ४५ उमेदवार मैदानात राहिले आहेत.


नायगाव बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. उमेदवारी दाखल करताना आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व राहिलेल्या नायगाव बाजार समितीमध्ये यंदा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी ऐनवेळी आपल्या समर्थकांचे अर्ज दाखल केल्याने मिळाली आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, गुरुवारी उमेदवारी अर्ज माघार घ्यावयाच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. बिनविरोध झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.


नायगाव बाजार समितीवर वसंतराव चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व राहणार असले तरी खतगावकरांच्या समर्थकांचा चंचुप्रवेश झाला आहे. शेवटच्या क्षणी बिनविरोधचे घोडे उध्दव ठाकरे यांच्या सेनेमुळे अडले होते. तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे यांनी आक्रमक भुमिका घेतली होती मात्र भाजप आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींनी स्विकृत सदस्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नायगाव बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोधचा प्रयोग यशस्वी झाला आहे. नायगाव तालुक्यात भाजप आणि काँग्रेस हे एक दुसऱ्याचे कट्टर विरोधक आहेत पण बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील एका एका गटाने तडजोडीचे राजकारण केले असल्याने विद्यमान आमदार राजेश पवारासाठी भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे.


एकंदरीत महाराष्ट्राचे राजकारण पाहताना नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील असे कोणालाही वाटले नाही परंतु ही बिनविरोध निवड निघाल्याने नायगाव शहरात विविध ठिकाणी कमालीची चर्चा रंगत आहे.