
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| देशातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पर्वतमाला योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेंतर्गत श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुकामाता मंदिरासाठी होऊ घातलेल्या रोप-वे प्रकल्पाचे काम उत्तमोत्तम व्हावे, त्यात कुठलीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व खा.हेमंत पाटील यांनी अस्ट्रिया येथे सुरु असलेल्या रोप- वे प्रदर्शनाला भेट देऊन जागतिक रोप- वे तंत्रज्ञान समजून घेतले. देशभरात २६० ठिकाणी रोप-वे करण्याकरिता प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्राप्त झाले आहेत. यात माहूरगड येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकामाता मंदिराचा देखील समावेश आहे.


राज्य सरकारने माहूर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित केला आहे.श्री रेणुकामाता, भगवान श्री दत्तात्रेय स्वामी व माता अनुसया या देव, देवतांचे दर्शन व संत महंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी येथे लाखो भाविक येतात. *माहूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी जाण्याकरिता सोयीचे व्हावे याकरिता रोप-वे ची आवश्यकता आहे.केंद्राच्या पर्वतमाला योजनेंतर्गत रोप-वे बांधकामाकरिता मान्यता देऊन निधी देण्यात यावा याकरीता पाठपुरावा करीत होतो.


हे पर्यटन आणि तीर्थस्थळ ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. या तीर्थस्थळावर जाण्यासाठी रोप-वे बांधकामाची मागणी सातत्याने केली जात आहे. किंबहुना हा भाग आर्थिक दृष्ट्यामागास असून आदिवासी बहुल भाग आहे. या तीर्थस्थळावर रोप-वे झाल्यास येथील या भागाच्या पर्यटनाला व अर्थकारणास चालना मिळेल या उद्देशाने आस्ट्रिया येथे सुरु असलेल्या जागतिक रोप-वे आणि एअरबस प्रदर्शनास केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासमवेत जाऊन भेट देण्याचा योग्य आला.


याठिकाणी रोप- वे आणि एअरबस चे नवनवीन प्रकार, त्यांचे आधुनिक तंत्रज्ञान पाहता आले आणि यासर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या मतदारसंघात कसा लाभ करुन घेता येईल याची चाचपणी करता आली. अशी प्रतिक्रिया खा. हेमंत पाटील यांनी समाज माध्यमातून दिली आहे. छोटी काचेची लिफ्ट, त्यानंतर ट्रॅव्हलर आणि पुढे लिफ्ट बसविण्यात येईल, सदरचे काम अगदी माफक दरात होईल,त्यामुळे दिव्यांग व वृद्ध भाविकांना ‘श्री’ चे दर्शन घेणे सुलभ होईल. असे स्पष्ट करून लवकरच भूमीपूजन करण्याचे आश्वासन ना. नितीनजी गडकरी यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दिले आहे.
