
नांदेड| शहरापासून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात पुन्हा एकदा लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. गोवर्धन घाट, नगिना घाट, बंदा घाट या नदी घाटांवर मृत माशांचा खच आढळून आला आहे. या मृत माशांमुळे नदी घाट परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून, हे मृत मासे आले कुठून आणि त्यांचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला. हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु दूषित पाण्यामुळेच या माशांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.


नांदेडच्या गोदावरी नदीत मागील दीड वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारे गोदावरी नदीपात्रात मृत माशांचा खच आढळला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी, महापालिकेचे व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या मृत माशांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. मात्र हा अहवाल अजूनही गुलदस्त्यातच आहे.


तो अहवाल अद्यापही पुढे आला नसताना दुसऱ्यांदा हा गंभीर प्रकार घडला आहे. आजघडीला देखील येथील गोदावरी नदीत जवळपास २४ मोठ्या नाल्यांचे घाण पाणी सोडले जाते. यात नदीपात्रालगत असलेल्या मोठ्या ड्रेनेजचे सुद्धा पाणी मिसळत असल्याने नदी दूषित होत आहे. यास नांदेड वाघाला महानगरपालिका जबाबदार आहे. यास प्रकारास दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बिरजू यादव यांनी केली.

