
स्वतःच्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले नसताना देखील केवळ शेतकऱ्यांचे नाव समोर करून मराठवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकारण करू पाहणाऱ्या ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या छत्रपती संभाजी नगर येथील सभेकडे एका वेगळ्या राजकीय दृष्टिकोनातून पाहता येईल. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांच्यावर ‘लिकर स्कॅम’ चा मोठा आरोप असून त्यांची यासंदर्भात ईडीकडून चौकशी सुरू आहे. १५ किलो तूप या कोडवर्डद्वारे १५ कोटी रुपयांचा पाच वेळेस व्यवहार म्हणजेच ७५ कोटी रुपये या आरोपाखाली के. कविता यांची ईडी कडून चौकशी सुरू आहे.


या प्रकरणात सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याने भविष्यात त्यांच्यावर कारवाई झाल्यास महाराष्ट्रात राजकारण सुरू केल्याने भाजपने के. चंद्रशेखर राव यांना अडचणीत आणण्यासाठी खेळलेला राजकीय डाव असा आरोप ‘बी आर एस’ ला भविष्यात करता येईल, या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या आड बीआरएसचे हे महाराष्ट्रात राजकारण सुरू झालेले आहे. मोठे आर्थिक व्यवहार करत असताना किलोची भाषा वापरली जाते. त्याच पद्धतीने के. कविता यांच्याशी पंधरा किलो तूप हा कोडवर्ड वापरून पंधरा कोटी रुपये दारूच्या व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.


तेलंगणात भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एस च्या विरोधकांनी त्यांच्या याच मुद्द्यावरून रणकंदन माजविले आहे. तेलंगणात भाजपनेदेखील बीआरएसला याच मुद्द्यावरून कोंडीत पकडले आहे. किंबहुना इडीने देखील के. कविता यांची यापूर्वीही याच मुद्द्यावर चौकशी केलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मराठवाड्यातून स्वतःच्या राजकीय पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. भविष्यात महाराष्ट्रातील विधानसभा तसेच देशभरातील लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षाचा विस्तार देशभर करण्याचे जाहीर केले आहे. याच उद्देशातून त्यांनी मराठवाड्यातील नांदेड येथे ५ फेब्रुवारी रोजी पहिली जाहीर सभा घेतली.


त्यानंतर महिन्याभरातच दुसरी जाहीर सभा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे घेऊन त्यांनी आपण केंद्रीय स्तरावरील राजकारणात महाराष्ट्रातून प्रवेश करीत आहोत अशी एक गर्जना देखील केली. यापूर्वी नांदेड जिल्ह्यात झालेल्या दोन्ही सभांमधून आपले हे राजकारण शेतकऱ्यांसाठी आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे झालेल्या जाहीर सभेसाठी नागरिकांना जमविण्यासाठी बी आर एस ने ३०० व ५०० रुपये वाटले, अशी चर्चा सुरू होती . व तसे काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा काय प्रकार? असा सवालही उपस्थित करण्यात आला होता . या वर्ष अखेर तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत स्वतःला व आपल्या समर्थकांना तिकीट मिळावे व के. चंद्रशेखरराव आपल्यावर खुश राहावे, यामुळे तेलंगणातील काही मंत्री तसेच विद्यमान आमदारांनी आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी लोहा व नांदेड येथील सभेला गर्दी जमविण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली होती. त्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यात पैशांचा महापुर आणला होता. तेलंगणातील हजारो शेतकरी आजही कर्ज माफ न झाल्याने त्रस्त आहेत .

प्रत्यक्षात ‘रयतू बंधू ‘ या नावाने तेलंगणामध्ये केवळ धनाढ्य शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात आहे, असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या सहा- सात वर्षांपासून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे डोंगर व्याजापोटी दिवसेंदिवस वाढत असल्याने तेथील शेतकरी खरोखरच सुखी नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर तेलंगणा राज्याची स्थापना व्हावी यासाठी जीव गेलेल्या अनेक कुटुंबीयांना आजही शासकीय सेवेत सामावून घेतलेले नाही . त्यांना सुरुवातीला के. चंद्रशेखर राव यांनी दिलेले आश्वासन आजपर्यंत पूर्ण केलेले नाही. असे असताना स्वतःच्या राज्यातील जनतेचे समाधान न करू शकणाऱ्या या पक्षाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन देण्याची राजकीय खेळी केवळ ईडीच्या सुटकेसाठी सुरू केली आहे की काय? असा सवाल राजकीय क्षेत्रात उपस्थित केला जात आहे. सध्या तेलंगणात आयएएस व आयपीएस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘टी एस पी एस सी’ व ग्रुप परीक्षेचे पेपर लीक झाल्याने तेथील तरुणाई बीआरएस वर प्रचंड रोष व्यक्त करत आहे.

लिकर स्कॅम व पेपर लीक या दोन मुद्द्यावरून बी आर एस अगोदरच तेलंगणा राज्यात बदनाम झालेली आहे. अशा परिस्थितीत बी आर एस ने मराठवाड्यात सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. तेलंगणात ‘मिशन भगीरथ’ व ‘मिशन काकतीया’ याद्वारे घरोघरी पाणी देण्याचा संकल्प केला होता. परंतु आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पाईपलाईन करण्याचे काम सुरूच आहे. व ज्या ठिकाणी पाईपलाईन झालेली आहे त्या ठिकाणी लाईट बिल जास्त येत असल्याने पाणीपुरवठा बंद झालेला आहे . अनेक ठिकाणी पाणीच येत नसल्याने जनता तेलंगणामध्ये राज्य सरकारवर प्रचंड नाराज आहे. स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेला मोठेपणा सांगून मराठवाड्यात व महाराष्ट्रातील राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण करू पाहणाऱ्या बी आर एस च्या गळाला मराठवाड्याच्या राजकारणातून बाजूला फेकल्या गेलेले नेते लागले आहेत.

छत्रपती संभाजी नगर येथील आमखास मैदानावर २४ एप्रिल रोजी के. चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसापूर्वी बी आर एस मध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अभय चिकटगावकर व मौलाना अब्दुल खादिर यांनीही प्रवेश केल्याने बी आर एस ला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात चांगले स्थान मिळेल अशी बी आर एस च्या नेत्यांची धारणा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर- खुलताबाद विधानसभेचे माजी आमदार अण्णासाहेब माने व त्यांचे सुपुत्र संतोष माने यांनी देखील बीआरएस मध्ये प्रवेश केल्याने भविष्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार सतीश चव्हाण यांना मोकळे रान झाले आहे.
अण्णासाहेब माने हे १९९९ ते २००९ या काळात शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर मात्र २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. व स्वतःचे सुपुत्र संतोष माने यांना उमेदवारी मिळवून दिली. परंतु भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यासमोर संतोष माने यांचा टिकाव लागला नाही. विधानसभेच्या निवडणुकीत माने यांचा पराभव झाल्याने तेव्हापासून ते राष्ट्रवादीवर नाराज होते. अलीकडच्या काळात आमदार सतीश चव्हाण यांचा गंगापूर- खुलताबाद विधानसभेत जास्त इंटरेस्ट दिसून येत असल्याने आपल्याला वेगळी वाट धरावी लागेल, या उद्देशाने माने पिता-पुत्रांनी बी आर एस ची वाट धरली. मराठवाड्यातील पडीत असलेले आणखी काही नेते २४ एप्रिल रोजी होणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या सभेत बी आर एस मध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. लिकर स्कॅम व पेपर लिक प्रकरणामुळे तेलंगणात अगोदरच वाद पेटलेला असताना दुसऱ्या राज्यात जाऊन राजकारण करू पाहणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांनी किमान या दोन प्रश्नांची उत्तर छत्रपती संभाजीनगर येथील सभेत द्यावी, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
….डॉ. अभयकुमार दांडगे मराठवाडा वार्तापत्र, ९४२२१७२५५२, abhaydandage@gmail.com