
बावलगाव/ बिलोली। इंग्रजी भाषेच्या भीतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी एकवीसाव्या शतकातील जीवघेण्या स्पर्धेत मागे पडताना दिसून येत आहे. आपला विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात टिकून राहावा यासाठी बिलोली तालुक्यातील बावलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतिने दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते ११ या वेळेत मोफत करिअर मार्गदर्शन व इंग्रजी संवाद कौशल्य मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


तेलंगाना सीमावर्ती भागातील ग्रामीण विद्यार्थी अत्यंत उमेदीने आपले शिक्षण घेत असतात आणि त्यांना त्यांचे पालक देखील सर्व ताकदीनिशी सहकार्य करीत असतात. मात्र विद्यार्थ्यांसह पालकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आणि इंग्रजी भाषेच्या भीतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी एकवीसाव्या शतकातील जीवघेण्या स्पर्धेत मागे पडताना दिसून येत आहेत. मार्गदर्शना अभावी विद्यार्थी जे शिक्षण निवडतात त्याला मार्केट मध्ये मागणी नसल्या कारणामुळे नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.


विद्यार्थी आणि पालकांच्या ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन बिलोली तालुक्यातील बावलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते ११ या वेळेत दहावी/ बारावी नंतर कोणता कोर्स निवडायचा.शासनाकडून शिक्षणासाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती योजना, इंग्रजी भाषा आत्मसात करून इंग्रजी भाषेत संवाद साधता येतील अशी संवाद कौशल्य मार्गदर्शन व वेगवेगळ्या शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या नामांकित महाविद्यालयांची माहिती.या विषयावर सीमावर्ती भागातील प्रमुख समन्वयक तथा प्रसिद्ध वक्ते , जेष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, जी.सिद्धार्थ स्पिकींग ॲकडमीचे इंग्रजी संवाद कौशल्य मार्गदर्शन तज्ञ जी. सिद्धार्थ,व एग्नेल टेक्निकल एज्युकेशन कॉम्प्लेक्स, वाशी नवीमुंबईचे प्रा. हनमंत पटने यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


तर बी.एम .पाटील गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, बिलोली, मगडलवार नामदेव केंद्रप्रमुख, बिलोली,लक्ष्मण गायकवाड सरपंच, बावलगाव,रमेश छप्पेवार उपसरपंच, बावलगाव,विठ्ठल छप्पेवार अध्यक्ष, शा.व्य.समिती बावलगाव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी तालुक्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षण प्रेमिंनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बावलगाव जि.प शाळा व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
