
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील शेल्लाळी येथे २१ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास लग्न कार्यातील आळंक्याच्या मिरवणुकीत सुतळी फटाके उडविण्याच्या झालेल्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन काही जण जखमी झाल्याची घटना घडली. २२ एप्रिल रोजी कंधार पोलीस ठाण्यात दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून १८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शेल्लाळी येथे राजू माधवराव केंद्रे यांच्या मुलाच्या लग्नकार्यातील अळंका बालाजी दगडोबा गीते यांच्या घरासमोरून जात असताना आमच्या घरासमोर सुतळी फटाके वाजवू नका असे बजावले असता वैभव विठ्ठल गीते व इतर ८ जणांनी अशी गैर कायद्याची मंडळी जमऊन घरावर दगडफेक करून चाकूचा धाक दाखवून सुनेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची दागिने काढून घेऊन त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. अशी तक्रार ज्योती बालाजी गीते (वय ३५ वर्ष) रा. शेल्लाली यांनी दिल्यावरून कंधार पोलिसांनी वैभव विठ्ठल गीते यांच्यासह ९ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.


तर दुसऱ्या गटातील वैभव बालाजी गीते व इतर ८ जणांनी अशी गैर कायद्याची मंडळी जमऊन अळंकाच्या मिरवणूकीवर दगडफेक करून राजू माधवराव केंद्रे(वय ४३ वर्ष) रा. शेल्लाळी यांना गावचा कारभारी झालास का म्हणून खंजीर ने डाव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली. व पत्नीला चाकूचा धाक दाखवून एक तोळा सोन्याचे गंठण काढून घेऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.


राजू माधवराव केंद्रे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वैभव बालाजी गीते यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. राजू माधवराव केंद्रे यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आदित्य लोणीकर व पीएसआय अरुण मुखेडकर करीत आहेत.
