Sunday, May 28, 2023
Home लेख डंख छोटा धोका मोठा हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी -NNL

डंख छोटा धोका मोठा हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी -NNL

by nandednewslive
0 comment

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणुन जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत २५ एप्रिल २०२३ रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Malaria : Invest, Innovate, Implement असे असुन भविष्यात या आजाराचा उद्रेक होवु नये म्हणुन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिने पुढील माहिती देण्यात येत आहे.

मागील तीन वर्षात नांदेड जिल्हयातील हिवताप आजाराची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. सन 2020 मध्ये 2,74,183 सन 2021 मध्ये 2,75,221 , सन 2022 मध्ये 4,41, 904 तर मार्च 2023 अखेर 1,26,527 याप्रमाणे घेतलेले व तपासलेले रक्त नमुने आहेत. तर हिवताप आजारात मागील तीन वर्षात मृत्यू निरंक आहेत.

हिवताप
हिवताप हा आजार “प्लाझमोडीअम” या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादी मार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

डासांची उत्पत्ती
स्वच्छ साठवुन राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते.

हिवतापाचा प्रसार
हिवताप प्रसारक अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होवुन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होवुन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.

हिवतापाची लक्षणे
थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येवु शकतो, ताप नंतर घाम येवुन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात.

रोग निदान
प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी :- हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासुन करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात. तात्काळ निदान पध्दती :- आर. डी. के. ( Rapid Dignostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्तनमुना घेऊन पी.एफ./पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते.

औषधोपचार
औषधोपचार कोणताही ताप हा हिवताप असु शकतो. प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्त नमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशी पोटी घेवु नये. गरोदर स्त्रीयांनी प्रायमाक्वीन औषधी घेवु नये व ० ते १ वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देवु नये.

हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनाः
1. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका.
2. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.
3. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
4. झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरूण घेवून झोपावे.
5. संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.

6. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) नये.
7. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.
8. वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य खात्याकडुन करण्यात आले आहे.

….डॉ. आकाश देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!