
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील संगीत विभागाच्या वतीने दोन दिवसीय संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ख्याल शैलीच्या प्रभावी प्रस्तुतीकरण्यासाठी आवाज साधना व रियाज’ या विषयावर दोन दिवसीय संगीत कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख तथा शास्त्रीय गायक डॉ. कुणाल इंगळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आवाज साधना, ख्याल शैलीचा अभ्यास, रियाज व त्याचे प्रस्तुतीकरण कसे असायला पाहिजे याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले.


या कार्यशाळेचे उद्घाटन आंतरविद्याशाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पानसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोनारकर, नांदेड येथील सरस्वती संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. व्यंकट कोत्तापल्ले यांच्यासह संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर आणि या दोन दिवसीय कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. कुणाल इंगळे हे स्वर मंचावर उपस्थित होते.


ख्याल शैलीच्या प्रभावी प्रस्तुतीकरण्यासाठी आवाज साधना व रियाज या विषयावर दोन दिवसीय संगीत कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना आवाजाची साधना, आलाप रियाज, तानांचा रियाज, मैफिली मध्ये ख्यालाचे सादरीकरण, बंदिशीचे सौंदर्य यासह अनेक रागातील बंदिशी आणि वेगवेगळ्या गीतांना चाली, संगीत कशा द्यायचे याविषयी डॉ. कुणाल इंगळे यांनी येथोचित मार्गदर्शन केले व विद्यार्थ्याकडून गाऊन घेतले. या कार्यशाळेमध्ये जवळपास ८० विद्यार्थ्यांनी व संगीत प्रेमी यांनी सहभाग नोंदविला होता.


कार्यशाळेच्या समारोपापूर्वी या दोन दिवसीय संगीत कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. कुणाल इंगळे यांचे शास्त्रीय गायन संपन्न झाले. त्यामध्ये भटियार, पुरिया या रागामध्ये बडाख्याल, छोटाख्याल सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. सोबतच मराठी गझल, हिंदी गझल गाऊन विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. मैफिलीचा शेवट मिरेचे भजन गाऊन केला. त्यांना हार्मोनियमची साथ डॉ. शिवराज शिंदे, प्रा. नामदेव बोंपिलवार यांनी दिली तर तबल्याची साथ सचिन बोंपिलवार, स्वप्निल धुळे व तानपुरा साथ गजानन गोंधळी यांनी केली.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंद्रकांत बावीस्कर, डॉ. कुणाल इंगळे हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन दिवसीय कार्यशाळेतील मार्गदर्शनाविषयी भावना व्यक्त केल्या. या कार्यशाळेला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संगीत विभागातील प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा, नामदेव बोंपिलवार यांनी अथक परिश्रम घेऊन दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वी केली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन दिपा बोंडलेवाड यांनी केले.
