
नांदेड। जिल्हयातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती आयएसओ मानांकन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्हयातील ग्रामपंचाती आयएसओ करण्याकडे कल आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल रोजी लोहा तालुक्यातील दगडगाव ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे.


सदरील कार्यक्रम सोहळा दगडगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रभारी गट विकास अधिकारी डी.आय. गायकवाड, कृषी अधिकारी शैलेश व्हावळे, सरपंच लक्ष्मी नवरे, उपसरपंच भाग्यश्री ढवळे विस्तार अधिकारी देशपांडे, मेहत्रे, आयएसओ टीम लीड ऑडिटर अनिल येवले, गजानन शिंदे, ग्रामसेवक संघाचे जिल्हा अध्यक्ष मधूकर मोरे, ग्रामसेवक उराडे, हंबर्डे, लाटकर, पांचाळ, ग्रामसेवक बालाजी घुमलवाड आदींची उपस्थिती होती.


यावेळी गट विकास अधिकारी यांनी वसुली, गावातील स्वच्छता, माझी वसुंधरा याबाबत माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतील घरावर मुलीच्या नावाच्या पाट्या लावण्याच्या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा यावेळी संपन्न झाला. या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापशे वेळावेळी मार्गदर्शन मिळाले.

