
नांदेड। शालेय विद्यार्थ्यांमध्ये समृद्ध राष्ट्रभावनेसह मानवी जीवनमूल्य रुजवण्याची गरज आहे. यासाठीच जिल्ह्यातील सर्व शाळांमधून भारत माझा देश आहे अर्थात प्रतिज्ञा प्रबोधन उपक्रम राबवण्यासाठी सर्व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.


लक्ष्यवेध फाउंडेशन आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांसाठी कुसुम सभागृह नांदेड येथे मंगळवार दिनांक 25 एप्रिल रोजी एक दिवसीय प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, एकनाथ उर्फ अनिल मोरे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रा. डॉ. हनुमंत भोपाळे, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, संगमेश्वर लांडगे, शिवाजीराजे पाटील, शिवा कांबळे, जगन शेळके, पंढरीनाथ बोकारे, डॉ. नीलकंठ डांगे आदींची मंचावर उपस्थित होते.


पुढे ते म्हणाले, आपला देश बहुआयामी देश आहे. यातील प्रतिज्ञा हे महाकाव्य आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगून हे अभियान गतिमान करावे, यासाठी शिक्षण विभाग सक्षम असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात कापणीमुक्ती अभियान चांगल्या पद्धतीने राबविण्यात आले. विद्यार्थ्यांचे परीक्षेची भीती घालवण्यासाठी कॉपीमुक्तीचा उपक्रम वर्षभर राबवला पाहिजे. कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना जास्तीचे वर्ग घेऊन त्यांना प्रवाहात आणावे, असेही ते म्हणाले. प्रारंभिक दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अविनाश भुताळे व प्रमोद फुलारी यांनी स्वागत गीत गायले. त्यानंतर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.


आपल्या आयुष्यात जो प्रभाव टाकलेला असतो ते गुरुजन असतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळे उभारी देण्याचे कामही शिक्षक करतात म्हणूनच भारत माझा देश आहे यातील माझेपणाची भावना विद्यार्थ्यांमधे रुजवून बंधुभाव निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन भावी पिढी सक्षम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. लक्ष्यवेध फाउंडेशनच्या माध्यमातून मानवी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी भारत माझा देश आहे हा उपक्रम प्रत्येक शाळेतून कशा पद्धतीने राबवावा याविषयीची माहिती दिली तर या मागची भूमिका एकनाथ मोरे यांनी प्रास्ताविकेत विशद केली. याप्रसंगी स्वागताध्यक्ष कामाजी पवार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डॉ. सविता बिरगे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर, पत्रकार आनंद कल्याणकर, अँड धोंडीबा पवार, दिलीप इंगोले यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी व शिक्षण प्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
