
नांदेड। शालेय जीवन जगत असताना यशस्वी होण्यासाठी जेवढी शिक्षणाची गरज आहे. तेवढीच संस्काराची ही गरज आहे. शिक्षणामुळे ज्ञान तर संस्कारामुळे तो प्रामाणिकता वाढते. हल्ली शिक्षण विकत घेता येते, याचे अनेक केंद्र सहज उपलब्ध आहेत. प्रामाणिकतेच्या केंद्राची वाणवा निर्माण झाली आहे..असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते गोविंद मुंडकर यांनी केले. ते दि. २४ एप्रिल रोजी बिलोली तालुक्यातील बावलगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने आयोजित मोफत करियर मार्गदर्शन शिबिराप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.


पुढे बोलताना मुंडकर म्हणाले की, आज शिक्षणाकडे शहरासह ग्रामीण भागातील पालक अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या पाल्याला चांगले व दर्जेदार शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी ते व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत. मात्र पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणा बरोबरच त्यांना संस्कार देणे ही आवश्यक आहे. कारण शिकून मोठा माणूस होता येते मात्र प्रामाणिकपणासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. हल्ली सहजपणे शिक्षण विकत घेता येते ,प्रामाणिकता विकत घेता येत नाही. देशाला उच्च शिक्षीताबरोबरच प्रामाणिक माणसांचीही नितांत आवश्यकता आहे.


शाळेचा उत्कर्ष करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करून देणे,जिल्हा परिषद शाळा टिकून ठेवणे, शिक्षणासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवणे, मुलांसोबत संवाद साधताना त्यांनी आई,वडील आणि प्रामाणिक शिक्षक हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत. हे प्रगट करत असताना जीवनातील त्यांचे मूल्य अधिक असल्याचे व्यक्त करण्यात आले. ही तीन व्यक्ती सकारात्मक बदल घडून आणतात. त्यामुळे त्यांना कधी विसरायचे नाही. हा संदेश त्यांना दिला.तर शिक्षणाधिकारी बालाजी पाटील यांनी विद्यार्थी आणि पालकांना प्रभावी असे मार्गदर्शन केले. जी.सिद्धार्थ यांनी इंग्रजी बोलता येण्यासाठीच्या काही सोप्या सोप्या गोष्टी त्यांनी मुलांकडून करून घेतल्या.


त्यानंतर प्राध्यापक हाणमंत पटणे यांनी आपली शाळा आयएसओ मानांकन प्राप्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुलांना करिअर विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बावलगावचे उपसरपंच रमेश छप्पेवार यांची तर केंद्रप्रमुख मगडलवार,गट साधन केंद्राचे विषय तज्ञ हलगरे ,राठोड ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल छपेवार,उपाध्यक्ष ताहेरसाब पठाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ राचेवाड यांनी केले, प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक कसलोड यांनी केले,तर आभार प्रदर्शन माणिक शिरगिरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक सौ. शारदा कनशेट्टे,कल्पना बोधणे,गंगाधर रामटक्के,विलास ठोमसे, शिवकुमार पटणे,माणिक शिरगिरे , भुमेश्वर मातेश्वर, नरसिंग व्हनलवाड,दीपक धडेकर, दत्ता पटणे,रमेश पटणे,मंगलबाई म्याकलवार, सोफियान शेख,गंगाधर छप्पेवार,आदीनी प्रयत्न केले.
