
नांदेड। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ३० एप्रिल रोजी नांदेड येथे एम.एस.पी. गॅरंटी परिषद आयोजित करण्यात आली असून माजी खासदार राजु शेट्टी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.. एम. एस. पी. गॅरंटी किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार व्ही.एम.सिंघ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


आजच्या घडीला आपल्या देशात उत्पादित होणार्या एकूण पिका पैकी फक्त 23 पिकांना हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. याउलट किमान वेतन कायद्याच्या धर्तीवर असंघटित कामगारांना शासनाने किमान वेतन कायदा लागू करून त्यांना संरक्षण दिले आहे. तसेच त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करून दिले आहे. याच धर्तीवर शेतकर्यांना किमान हमीभाव लागू करूनही त्यास संरक्षण नसल्याने नियमितपणे शेतकर्याकडून हमीभावापेक्षा कमी किमतीतच शेतमाल खरेदी केला जातो. त्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या पिकासाठीचा उत्पादन खर्चही मिळत नाही. पर्यायाने शेतकर्यावरील कर्जाचा बोजा वाढून, हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतात.


त्यामुळे शासनाने सर्वच प्रकारच्या शेतमालास हमीभाव कायदा लागू करून त्यास संरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. “शेतमालास कायद्याने मंजूर हमिभावापेक्षा कमी किमतीमध्ये कुणालाही शेतकर्यांच्या शेतमालाची खरेदी करता येणार नाही” अश्या आशयाचा कायदा केंद्र शासनाने मंजूर करून लागू करावा. यासाठी सदरील विषयावर शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेमध्ये जंनजागृती आणि चर्चा व्हावी या अनुषंगाने “एम. एस. पी. (Minimum Support Price) गॅरंटी परिषद” आयोजित करण्यात आली आहे. हि परिषद गोकुळनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्क मधे ३० एप्रिल रोजी सांयकाळी ४ वाजता होणार आहे.


या परिषदेत माजी खा. राजु शेट्टी ( संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना ) , माजी आ. सरदार व्ही. एम. सिंघ (एम. एस. पी. गॅरंटी किसान मोर्चा, राष्ट्रीय अध्यक्ष) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सदरील कार्यक्रमासाठी शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदेड चे वतीने करण्यात आले आहे.
