
नांदेड। जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयाची मदत करावी. अशी मागणी रयत क्रांती संघटना वतीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.


निवेदनामध्ये असे म्हटले आहे की,नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाऊस, प्रचंड प्रमाणात गारपीट, वारे वादळे चालू आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे.


केळी, आंबा ,हळद, उन्हाळी ज्वारी आणि भाजीपाला,फुले इत्यादी हा जमीनदोस्त झालेले आहेत. गेल्या महिन्यामध्ये असाच प्रकारे जिल्ह्यामध्ये गारपीट व पाऊस झाल्यामुळे पिकाचे नुकसान झाले होते. दुबार नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे ,यातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घेत शेतकऱ्याला मदत करावी.


पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या- बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयाची मदत द्यावी. भाजीपाला आणि फुले उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयाची मदत द्यावी. जिरातदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत द्यावी. गावातील घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबाला प्रती कुटुंब १ लाख रुपयाची मदत करावी. विज पडून बैल गाय म्हैस इत्यादी मृत्यू पडलेल्या पशुधन मालकाला तात्काळ मदत करावी. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे , श्रीकृष्ण चव्हाण उपस्थित होते.
