
नवीन नांदेड। जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आधी मार्चमध्ये आणि आता एप्रिल महिन्यात वारंवार होत असलेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे नांदेड दक्षिण मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक भागातील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नांदेड दक्षिणचे आ. मोहनराव हंबर्डे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे.


नांदेड दक्षिण मतदारसंघातील भनगी व नदीकाठावरील गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. वर्षभर प्रचंड मेहनत आणि अफाट खर्च करून तळ हातावरील फोडासारखे आणि पोटच्या मुलांसारखे शेतकर्यांनी पिकांना जोपासले होते.


परंतु निसर्गाने दगा देवून संपूर्ण पिके उध्वस्त केली. शेतीपिकांचे झालेले नुकसान अपरिमीत असून जीवापाड प्रेम करून जपलेली जनावरे डोळ्यादेखत दगावली तर काही जखमी झाली आहेत.अशा परिस्थितीत नांदेड दक्षिणचे आ.मोहनराव हंबर्डे यांनी तात्काळ धाव घेत शेतकर्यांना दिलासा दिला. त्यांना अर्थसाह्य मिळावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात संपर्क साधून शेतकर्यांच्या व्यथा पोहोचविल्या प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशा सूचनाही दिल्या.


संकटकाळात वेळोवेळी धावून जाणारे आ. मोहनराव हंबर्डे यांनी आपद्ग्रस्त भागाचा दौरा करून शेतकर्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या कुटुंबांचीही विचारपूस केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ प्रशासनाकडे पाठविण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्यामुळे शक्य तितक्या लवकर शेतकर्यांना अर्थसाह्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
