
पुणे। भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘लक्ष्य ‘ या नृत्य कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गुरुवार , २७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.


शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा हा कार्यक्रम ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांच्यातर्फे प्रस्तुत करण्यात आला. पुण्यात सुरु असलेल्या ‘पुणे डान्स सिझन-२०२३’ मधील अनेक कार्यक्रम मालिकेतील हा कार्यक्रम एक भाग होता. त्यात डॉ. शशिकला रवी(भरत नाट्यम),सुकन्या कुलकर्णी(भरत नाट्यम),नीलिमा हिरवे(कथक) यांचे बहारदार नृत्य सादरीकरण झाले. सर्वप्रथम सुकन्या कुलकर्णी यांनी तोडा नगलम नृत्य प्रस्तुती , नंतर सूरदासांचे भजन सादर केले.


नीलिमा हिरवे यांनी ‘महादेव शिवशंभो ‘ या शिववंदनेने सादरीकरणाची सुरवात केली. त्यानंतर प्रल्हाद कथा , लिंगोद्भव शिव या रचना सादर केल्या. या सर्व रचनांना चांगला प्रतिसाद मिळाला.डॉ. शशीकला रवी यांनी त्यागराजन, मुथूस्वामी दीक्षित यांच्या रचना सादर केल्या. अर्धनारीनटेश्वर स्तुतीने त्यांनी समारोप केला. या तिन्ही सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले.


भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे , सुचित्रा दाते, मेघना साबडे यांनी कलाकारांचा सत्कार केला. नृत्य गुरु शमा भाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६२ वा कार्यक्रम होता .
