
आमच्या काळातील शिक्षणंच वेगळं होतं, आताचे शिक्षण व पूर्वीचे शिक्षण यामध्ये जमीन आसमानचे फरक आहे, असे शब्द आपल्या कानावर अनेकदा येतात. त्याचे कारणही तसेच आहे , पूर्वीची शिक्षण पद्धती ,पूर्वीचे शिक्षक व पूर्वीचे विद्यार्थी याची गोष्टच येत नाही. शिक्षक हा बुद्धिजीवी वर्ग आहे. शिक्षकाच्या बळावरच समाजाची प्रगती होत असते. समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते. एक चांगला देश घडविण्यासाठी शिक्षक व शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. हेच धोरण घेऊन मराठवाड्यात शिक्षक आमदार पी.जी . दस्तुरकर यांनी स्वतःला शैक्षणिक कार्यात वाहून घेतले होते. २७ एप्रिल रोजी शिक्षक आमदार पीजी दस्तुरकर यांची तेरावी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मराठवाड्यातील त्यांच्या शैक्षणिक कार्याचा लेखाजोखा मांडण्याचा हा प्रपंच.


१९७० च्या दशकात मराठवाडा शिक्षक मतदार संघ हा नाशिक शिक्षक मतदारसंघात समाविष्ट होता. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ हा स्वतंत्र मराठवाड्याला वेगळा मिळाला पाहिजे , यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये शिक्षक आमदार पी.जी. दस्तुरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मराठवाडा विभागातील शिक्षकांच्या चळवळीत अग्रभागी राहून ज्यांनी शिक्षक घडविण्याचे कार्य केले, त्यामध्ये शिक्षक आमदार पी.जी. हे सर्वात पुढे होते. शिक्षक चळवळीत कसे काम करावे व शिक्षकांचा आमदार कसा असावा याबाबत दस्तुरकर यांनी मराठवाड्यात जनजागृती केली. शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी शिक्षक आमदार राजाभाऊ उदगीरकर व अनंतराव देशमुख यांच्यासोबत मराठवाड्यात दौरे करून शिक्षकांच्या व्यथा जाणून घेण्याचे काम शिक्षक आमदार पी.जी. दस्तुरकर यांनी केले होते.


१९७० पासून दस्तुरकर यांनी सुरू केलेले कार्य अनेक वर्ष सुरूच होते. १९९२ मध्ये मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेत शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवून घेतले. १९९२ ते ९८ या कालावधीत शिक्षकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य दस्तुरकर यांनी केले. त्यांच्या कार्याची दखल केवळ मराठवाड्यापूरतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी घ्यावी लागली. मराठवाड्यासाठी वैधानिक विकास मंडळाची स्थापना तसेच नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची उभारणी याबरोबरच राज्यातील सर्व शिक्षकांसाठी पाचवा वेतन आयोग केंद्र सरकारच्या धरतीवर लागू करावा, म्हणून आंदोलन पुकारणारे शिक्षक आमदार पी.जी. दस्तुरकर यांच्या कार्याची आठवण आजही प्रकर्षाने होते. शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे, असे वारंवार म्हणत शिक्षकांमुळे देश घडतो व एक चांगला देश जगात विकासाची नांदी आणतो, असे शिक्षक आमदार पी.जी. दस्तुरकर नेहमी सांगत असत.


विद्यार्थीप्रिय शिक्षक हा सध्याच्या घडीला समाजात आवश्यक आहे .त्याचबरोबर भ्रष्टाचारमुक्त गुणात्मक शिक्षण व भयमुक्त शिक्षक ही देखील आजच्या समाजाची गरज आहे. आज मराठवाड्यात सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. कोचिंग क्लासेसवाल्यांनी शाळा नेस्तनाबूत केल्यात जमा आहेत. शाळा व कॉलेज नावापूरते शिल्लक राहिले आहेत. लाखो रुपये फीस भरून कोचिंग क्लासेसचे हॉल फुल्ल होत आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे चित्र तर खूपच भयावह आहे. आज घडीला कुठल्याही पक्षाचा नेता व कोणताही शिक्षक आमदार शिक्षणाच्या खऱ्या व्यथा मांडत नाहीत, अशी शिक्षणप्रेमींची तक्रार आहे. समाजाला खरी दिशा देणारा हा शिक्षकच असतो परंतु आज घडीला ग्रामीण भागातील शिक्षण व शिक्षकच भरकटला जात असल्याने भविष्यात होणाऱ्या फार मोठ्या नुकसानीची जाणीव आजघडीला कोणालाच नाही. जर्मनीमध्ये शिक्षकाला सोशियल इंजिनियर असे म्हणतात . कारण शिक्षक हा समाज घडविण्याचे काम करतो. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात शिक्षकाकडे एक श्रमजीवी कामगार किंवा रोजंदारीवरचा कर्मचारी म्हणून पाहण्यात येते, हे फार मोठे दुर्दैव आहे.

सर्वच शिक्षकांच्या बाबतीत हे सूत्र लागू पडते असे नव्हे तर रोजंदारी व ठराविक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत मात्र हे वाक्य तंतोतंत लागू पडते. आज मराठवाड्यातील शेकडो शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. शाळा आणि शाळांची संस्कृती हळूहळू लोप पावत आहे. शिक्षक आमदार पी.जी. दस्तुरकर यांनी याबाबत अनेक वर्ष काम केले. मराठवाड्यात आजच्या घडीला बी. एड., डी.एड. तसेच नेट- सेट व पी.एचडी. झालेल्या पात्र उमेदवारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण सेवक म्हणून काम करणारे आज ना उद्या सेवेत कायम होतील, या आशेवर जीवन जगत आहेत. तासिका तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक देखील उद्या चांगले दिवस येतील, या आशेवर शिक्षणाचे धडे देत आहेत. प्रत्यक्षात शिक्षक व प्राध्यापकांच्या या समस्या मांडण्यासाठी आज घडीला शिक्षक आमदार पी.जी. दस्तुरकर यांच्यासारखे नेतृत्व किमान मराठवाड्यात तरी शिल्लक राहिले नाही , ही एक शोकांतिकाच आहे. नेट – सेट तसेच पी.एचडी. केलेले शेकडो बेरोजगार तरुण शैक्षणिक कामात आपल्याला यश मिळणार नाही, हे लक्षात घेऊन अनेक ठिकाणी खाजगी नोकरी करत आहेत. तसेच अनेकांनी व्यवसाय उभा करून स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याचे काम सुरू केले आहे.

मूल्यांकन प्राप्त शाळांना अनुदान देऊन शिक्षकांना न्याय द्यावा, ही मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या व अशा अनेक प्रश्नांना न्याय देण्यासाठी शिक्षक आमदारही तेवढाच खंबीर व जागरूक असणे आवश्यक असते.केवळ शिक्षकांच्या बाबतीत नव्हे तर कामगारांच्या बाबतीतही मराठवाड्यात शिक्षक आमदार पी.जी. दस्तुरकर यांनी कार्य केलेले आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध अशा उस्मानशाही मिलच्या कामगार चळवळीतही दस्तुरकर यांचा खूप मोठा वाटा आहे . कामगार नेते अनंतराव नागापूरकर तसेच पी.जी. दस्तुरकर यांनी अवसायानात गेलेल्या सूतगिरणीमधील कर्मचाऱ्यांसाठी ५६ लाख रुपयांची नुकसान भरपाई शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी खूप मोठे आंदोलन केले होते. याशिवाय बंद पडलेल्या सूतगिरणीसाठी २००७ मध्ये त्यांनी खूप मोठी चळवळ उभी केली होती.

२००८ मध्ये नांदेडमध्ये झालेल्या गुरुतागद्दी सोहळ्यादरम्यान नो हाॅकर्स झोन हा विषय देश पातळीवर गाजला होता. फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्याचे खूप मोठे कार्य दस्तुरकर यांनी त्यावेळी केले. त्यांच्या आंदोलनामुळेच फेरीवाला कमिटीची स्थापना झाली. फेरीवाले व पोलीस यांच्यात त्यावेळी अनेकदा झुंबड उडाली होती. पोलिसांचे डोके फोडण्यापर्यंतचे प्रकरण फेरीवाल्यांच्या आंदोलनात झाले होते.१९९५ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन बद्दलचा कायदा विधान परिषदेत पास करून घेण्यामध्ये शिक्षक आमदार पी.जी. दस्तुरकर यांचा सिंहाचा वाटा होता. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील भूकंपग्रस्तांचे प्रश्नही त्यांनी शासन दरबारी मांडले होते व ते प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्यांनी कायमचा पाठपुरावा केला. या व ईतर अनेक प्रश्नांसोबतच शिक्षकांच्या संबंधित अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी शिक्षक आमदार पी.जी दस्तुरकर यांची मराठवाड्यातील जनतेला आजही प्रकर्षाने आठवण होते, हीच त्यांच्या कार्याची पावती होय असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
…..डॉ. अभयकुमार दांडगे नांदेड. ९४२२१७२५५२, abhaydandage@gmail.com