
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज दि.२८ रोजी शेवटपर्यंत अंदाजे ९४ टक्के मतदान पार पडले आहे. यात एकूण १२५७ मतदारापैकी ११८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, येथील मतदान केंद्रावर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. उद्या दि.२९ रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार असला तरी तिरंगी लढतीच्या निवडणुकीत कोणता गटाचे वर्चस्व प्रस्थापित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


गेल्या महिन्याभरापासून हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरु होती. या निवडणुकीत तीन गटाच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची निवडणूक करून शहरासह ग्रामीण भागात मतदारांच्या गाठी भेटी घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शर्तीचे पर्यटन केले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान आज दिनांक २८ रोजी सकाळपासून हिमायतनगर शहराजवळील आश्रम शाळेत निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले होते. यावेळी मतदान केंद्रावर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना भाजप गटाचे शेतकरी नेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थिती लावली होती.


आज संपन्न झालेल्या कृषी उतपन्न बाजार समितीच्या निवणुकीसाठी तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून २७६ मतांपैकी २७४ मतदारांनी मतदान केलं. हमाल मापाडी मतदार संघातून २०५ पैकी १७० मतदारांनी मतदान केले. व्यापारी मतदारसंघातून ३८९ पैकी ३७३ मतदान झाले आणि ग्रामपंचायत मतदार संघातून ३८७ पैकी ३६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. एकूण १२५७ मतदारापैकी ११८६ मतदारांनी मतदान केले आहे.


दरम्यान मतदान शांततेत संपन्न व्हावे यासाठी हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजण व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावला होता. एकूणच मतदान सुरु असताना किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले आहे. संपन्न झालेल्या या निवडणुकीत कोणत्या गटाचे वर्चस्व प्रतिष्ठापित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान ज्या त्या गटाच्या लोकांनी मतदानानंतर आकडेमोड सुरु केली असून, आमच्याच गटाचे वर्चस्व राहील असे ठामपणे सांगितले जात आहे. मतदान सुरु असताना काही राजकीय मंडळींकडून मतदारांना अमिश दाखविले गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. यावरच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार असल्याने हा सर्व खटाटोप झाला असल्याचे काहींनी नाव न सांगण्याची अटीवर बोलून दाखविले आहे.
