
नांदेड| मानसोपचार तज्ज्ञांच्या संघटनेने येथील हॉटेल भरत विट्स येथे 32 वी वेस्ट झोन मानसोपचार परिषद शनिवार, दि. 29 एप्रिल व रविवार, 30 एप्रिल रोजी आयोजित केली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. दि. भा. जोशी, डॉ. संदीप देशपांडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकानुसार कळविले आहे.


नांदेडमध्ये पार पडणाऱ्या दोन दिवसीय मानसोपचार परिषदेचे उद्घाटन डॉ. स्वप्नील लाळे व डॉ. लक्ष्मीकांत राठी यांच्या हस्ते होणार आहे. या मानसोपचार परिषदेमध्ये गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रातील 220 हून अधिक तज्ज्ञ मानसोपचार डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून, या परिषदेमध्ये डॉ. निलेश शहा, डॉ. टी. एस. राव, डॉ. मलयदवे यांचे मानसिक आजार आणि त्यावर उपाय या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे.


या परिषदेमध्ये मानसिक आजारासंदर्भात समज-गैरसमज याविषयी जनजागृती करण्यात येणार असून, परिषद यशस्वीसाठी डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. धनंजय आष्टूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

