
नांदेड। कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक मोहम्मद आरेफ खान यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी सूचनेवरुन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश प्रभारी व समन्वयक मोहम्मद अहमद खान तसेच कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. वजहात मिर्झा यांनी ही नियुक्ती केली आहे.


मोहम्मद आरेफखान हे गेल्या दोन दशकांपासून कॉंग्रेस पक्षात सक्रीय आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात. कॉंग्रेस कमिटीच्या सोशल मिडीया विभागाच्या प्रदेश चिटणीसपदावर ते कार्यरत आहेत. कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होवून उल्लेखनिय कार्य केले आहे.


त्यांच्या कॉंग्रेस पक्षातील संघटन बांधणी व कार्याची दखल घेऊन कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी यांनी मोहम्मद आरेफ खान यांची महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते एका कार्यक्रमात मोहम्मद आरेफ खान यांना प्रदान करण्यात आले. मोहम्मद आरेफ खान यांच्या निवडीचे कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

