
नांदेड| दासरी, मालादासरी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना मालादासरी कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही. मिळालेच तर समाजाकडे असलेल्या कास्ट सर्टिफिकेटची वैधता होत नाही. खरे पाहता दासरी, मालादासरी, होल्या दासरी, अय्यावारू, बुकय्यावारू हे समाज एकच आहे. घटनेमध्ये दासरी या जातीची नोंद घेतली गेली परंत्तू त्यात दासरे अशी चूक झाली ती दुरुस्त करून महाराष्ट्रातील दासरी, मालादासरी समाजास न्याय मिळून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर आणि खा.हेमंत पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.


या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, आम्ही सर्व दासरी व मालादासरी समाज एकच असून दोन्ही समाजाचा धर्म एक, कुलदैवत एक, धंदा पण एकच असून, हळद कुंकू, दातवन, करदोडे विकणे हा मूळ व्यवसाय दोन्ही समाजाचे लोक करतात. दोन्ही समाजात जवळचे संबंध असून, रोटी-बेटी व्यवहार सुरळीत चालतो आहे. आमचा समाज महाराष्ट्रात अत्यल्प (2500 ते 3000) एवढा असून, नांदेड, हिंगोली, परभणी यवतमाळ या चार जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याच्या आगोदर पासुन राहतो आहे.


यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा केला जात आहे. आम्ही दहा वर्षा पूर्वीपासुन शासन दरबारी निवेदन देऊन देखील विधानसभा सदस्य विधानसभेत आमच्या समाजाचा प्रश्न मांडत नाहीत. त्यामुळे आमच्या दासरी मालादासरी समाजाच्या विद्यार्थ्याना व नागरीकांना मालादासरी जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र जाणीव पूर्वक देण्यात येत नाहीत. त्यामुळे सामाजिक स्थिती अधिक खालावलेली आहे. महाराष्ट्रात अत्यल्प समाज असून देखील कोणालाही शासकीय सवलत अद्याप मिळाली नाही. पूर्वीचा आमचा जातीवंत व्यवसाय या काळाच्या ओघात बंद पडले असून, दुसरा व्यवसाय करणेसाठी कोणाकडेही भांडवल उपलब्ध नाही.


या समाजाला कोणतीही शासकीय सवलत जात प्रमाणपत्र पत्राच्या अभावी मिळत नाही. शासनाच्या गॅजेटमध्ये 40 नंबरला मालादासरी ही जात आहे. तरी पण जातीचे प्रमाणपत्र काहिंना मिळाले अजूनही तहसीलव्दारे मिळण्यास अडचणी येत आहेत. शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन देखील जातीच्या प्रमाणपत्राची वैधताही होत नाही. कारण समाजाकडे इ.स. 1950 च्या पूर्वीचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. हा समाज उदर निर्वाहसाठी खेडोपाडी, वाडी तांड्यावर भटकती करीत होता. पालकांच्या आज्ञानामुळे त्यांनी आपल्या पाल्याच्या टी.सी. वर दासरी, माला दासरी, होल्या दासरी, अय्यावारू, बुकय्यावारू अशा जातीचा उल्लेख झाल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.

यामुळे समाजातील अनेक युवक बेकार असून, त्यांना मजुरीशिवाय दुसरा पर्याय नाही. तर शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत, हि बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्याच्या टी.सी. वर चुकून पडलेली दासरी, माला दासरी, होल्या दासरी, अय्यावारू, बुकय्यावारू ह्या सर्व जाती वेगळ्या नसुन, एकच आहेत. हे गृहीत धरून फक्त मालादासरी मुख्य जात समजून सर्वांना माला दासरी प्रमाणपत्र विना अट देण्यात यावे आणि जात प्रमाण पत्राची वैधता मिळवून देऊन, गैजेटमध्ये दासरी ऐवजी दासरे झाले असून, यात दासरी अशी दुरुस्ती करून न्याय मिळवून द्यावा. असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. यावेळी दासरी, मालादासरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमूण्णा यंगलवार, सचिव बालाजी सादूलवार, गोविंद गोडसेलवार, अनिल मादसवार, सोपान बोम्पीलवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन न्याय मिळवून देणार
निवेदन स्वीकारल्यानंतर दासरी, मालादासरी समाजातील समस्यांबाबत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर आणि खा.हेमंत पाटील यांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन दासरी, माला दासरी समाज संघटनेच्या शिष्टमंडळींना दिले.