
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीदरम्यान झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गटाचा पराभव करून हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे कॉग्रेस पक्षाचे आ. माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी सर्वाधिक मते मिळविल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. अखेर हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा तिरंगा फडकला आहे. त्यानंतर जल्लोषपूर्ण वातावरणात फटाक्याची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.


मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तिरंगी लढतीसाठी रणांगणात उतरलेल्या उमेदवाराकडून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करण्यात आला होता. प्रचाराची सांगता झाल्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात काल दि.२८ रोजी मतदान झाले यात १२५७ पैकी ११८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याची मतमोजणी शनिवार दि.२९ रोजी सुरु झाल्यानंतर सकाळपासून सर्वच पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती. दरम्यान सुरुवातीच्या टप्प्यातील निकाल काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्याचं जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या इतर सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे काँगेसचा दणदणीत विजय होणार हे जवळपास निश्चितच झाले होते.


निकालाचा अंतिम टप्पा येताच १८ पैकी १८ उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताश्याच्या गजरात मतमोजणी स्थळापासून दुचाकी रैली काढून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात येताच गुलालाची उधळण करून विजय झालेल्या उमेदवारांना डोक्यावर घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. या रैलीत आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सुद्धा सहभागी होऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांत व्यापारी मतदार संघातुन संदिप शंकरराव पळशीकर यांचा २४३ मते घेऊन विजय झाला. स. रऊफ स. गफुर याना २१५ मते मिळाली. ग्राम पंचायत सर्वसाधारण मतदार संघातुन जेष्ठ पत्रकार परमेश्वर लक्ष्मण गोपतवाड यांना २२४ मते मिळाली. रामराव आनंदराव कदम यांना २०१ मते मिळाली. ग्राम पंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातुन धर्मराज गणपती शिरफुले यांना २२९ मते मिळाली तर ग्रामपंचायत अनुसुचित जाती/जमाती मतदार संघातुन दादाराव सदाशिव भिसे यांना २११ मते मिळाली.

तर सेवा सहकारी संस्था व मागासवर्गीय मतदार संघातुन सुभाष जिवनाजी शिंदे यांना १३० मते. सेवा सहकारी संस्था जाती भटक्या जमाती मतदार संघातुन श्यामराव दत्तात्रय गडमवाड यांना १२७ मते मिळाली. सेवा सहकारी संस्था महिला मतदार संघातुन शिलाबाई प्रकाशराव वानखेडे यांना १३८ मते, कांताबाई सजनराव सुर्यवंशी यांना १२९ मते मिळाली. सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातुन प्रकाश विठ्ठलराव वानखेडे यांना १३४ मते, जनार्दन रामचंद्र ताडेवाड यांना १३३ मते, संजय विनायक सुर्यवंशी यांना १३३ मते, राजेश मारोतराव चिकनेपवाड यांना १२९ मते, दत्ता पुंजाराम कोंकेवाड यांना १२६ मते, खंडु मारोती टेकाळे यांना ११८ मते तर कृष्णा तुकाराम राठोड यांना ११३ मते, आणि हमाल माथाडी मतदार संघातुन शे .मासुम शे.हैदर हे १४१ मते घेवुन विजयी झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या निवडणुकीत पुढे आलेल्या निकालानंतर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ माधवराव पाटील जवळगावकर यांच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. तर अन्य दोन्ही गटाचा धुव्वा उडाला असल्याची एकच चर्चा शहरासह तालुक्यात सुरू आहे. ही निवडणूक आगामी होणाऱ्या निवडणुकीची रंगीत तालीम होती, आगे आगे देखो होता है क्या..? हदगाव हिमायतनगर तालुका झालाय काँग्रेसचा बालेकिल्ला अश्या शब्दांत अनेकांनी काँग्रेस पक्ष्याच्या विजयाबद्दल स्तुती सुमने उधळली आहेत.
