
नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी व गारपीटीशी सामना करावा लागत आहे. 25 एप्रिल पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळ-वारा व काही भागात गारपिटीमुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.


मागील महिन्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीची जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी 19 मार्च रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. जिल्ह्यातील सुमारे 36 हजार 543 बाधित शेतकऱ्यांना शासनाने अवघ्या महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली. या शेतकऱ्यांसाठी 30 कोटी 52 लाख 12 हजार 385 एवढा निधी शासनाकडे मागितला. 10 एप्रिल 2023 अन्वये याला शासन निर्णयान्वये मंजुरीही देण्यात आली. सदर मदत बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे.


गारपीट, वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला व प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयाला दक्षतेचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल तिथे तहसिल, कृषि कार्यालयाचा प्रतिनिधी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

