
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेने यावर्षी ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी गाव स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.


केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी घटकांसाठी ग्रामीण भागात अंमलबजावणी सुरू आहे. ही मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 1 मेपासून सर्व गावांमध्ये कचरा मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. गाव कचरामुक्त करण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी गाव पातळी करण्यात येणार आहे. यासंदर्भात ग्रामसभेत आणि मासिक सभेत ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे.


यासाठी स्वच्छ भारत मिशन, 15 वा वित्त आयोग, मनरेगा, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व, नाविन्यपूर्ण योजना, लोकप्रतिनिधींचा विकास निधी, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निधी मधून खर्च करावा. निधी खर्च करताना त्या त्या योजनेची निगडित शासन निर्णयात नमूद अटी शर्तींचे व निकषाचे पालन करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी दिली आहे.

