
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरासह तालुक्यातील अनेक गाव परिसरात शनिवारी सायंकाळी 6 वाजता वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन तुफान पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली हळद भिजून गेली असून, ईतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तासभर मोठ्या प्रमाणात वादळी वारे, विजांचा कडकडाट सुरू असताना तालुक्यातील मौजे वडगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वीज कोसळून बैल दगावला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या 8 दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात ढगाळ वातावरण अधून मधून शिरव येण्याचा प्रकार सुरू होता. हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे दि.29 शनिवारी सायंकाळपासून तुफान वादळी वारे आणि विजांचा गडगडात होऊन अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागाचे नाले तुडुंब भरून वाहत होते तर वादळी वाऱ्याने अनेक घरावरील टीन पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान व बेहाल झाले आहे. तसेच रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या शेतीतील हळद, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, तीळ यासह भाजीपाला व आंब्याचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.


तर तालुक्यातील वडगाव ज येथील शेतकरी अशोक वाकोडे या शेतकऱ्याच्या शेतात वीज कोसळल्याने बैल दगावला, एक बैलास शेक लागून जखमी झाला आहे. यात शेतकऱ्याचे 70 हजाराचे नुकसान झाले असून, आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याचा सर्जा दगावल्यामुळे शेतकऱ्यावर खरीप हंगामाची तयारी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. अवकाळी पावसाचा कहर रात्री तीन वेळा झाला आणि आज देखील शकली एक तासभर जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.


वादळी वाऱ्याने अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेले असून, ग्रामीण भागातील अनेक झाडे देखील जमीनदोस्त झाल्याने ग्रामीण भागात मोठं नुकसान झाले आहे. याच बरोबर शेतकऱ्यांनी जमा केलेलं वैरण उडून गेल्यानं गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान ग्रस्तांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.
